बारामती : माळेगाव ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्याने पहिल्यांदाच निवडणूक होत असून, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार विरूद्ध ज्येष्ठ नेते बाळासाहेब तावरे, रंजन तावरे यांच्यात लढत होणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीत पराभव झालेल्या रंजन तावरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असून, ते भाजपकडून निवडणूक लढविणार की, विकास आघाडी तयार करणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे अध्यक्षपदाचे उमेदवार होते. त्या निवडणुकीत तावरे यांच्यामुळे ही लढत चुरसीची झाली होती. आता नगरपंचायतीच्या निवडणुकीच्यानिमत्ताने दुसऱ्यांना पवार विरूद्ध तावरे यांच्यात लढत होणार आहे.
माळेगाव नगरपंचायतीची ३० मार्च २०२१ रोजी स्थापना झाली. तत्पूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात होती. तालुक्यातील सर्वात मोठी ही ग्रामपंचायत होती. त्यामध्ये १७ सदस्य होते. जयदीप विलासराव तावरे हे शेवटचे सरपंच होते. या ग्रामपंचायतीत रंजन तावरे आणि बाळासाहेब तावरे या कारखान्याच्या दोन माजी अध्यक्षांचे वर्चस्व राहिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताकद पणाला लावूनही गेल्या २० वर्षांत ही ग्रामपंचायत पवार यांच्या ताब्यात आली नाही. आता ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगर पंचायत झाली.
ग्रामपंचायत अस्तित्वात असताना रंजन तावरे हे नेहमीच डोईजड व्हायचे. मात्र, माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत रंजन तावरे हे पराभूत झाल्याने त्याची राजकीय पकड ढिली झाल्याची चर्चा सुरू झाली. ज्येष्ठ नेते बाळासाहेब तावरे यांचा निसटता विजय कारखान्यात झाला. त्यामुळे नगरपंचायतीची निवडणूक रंजन तावरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. ते भाजपकडून निवडणूक लढविणार की, विकास आघाडी तयार करणार, याबाबत उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजप यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष या पक्षांचेही उमेदवार असणार आहेत.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उमेदवार देताना कसरत करावी लागली होती. नगरपंचायतीच्या निवडणुकीतही त्यांच्यापुढे उमेदवार निवडण्याचे आव्हान असणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे उसाचा भाव देण्यात आला नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या नाराजीचे पडसाद नगरपंचायतीच्या निवडणुकीत उमटणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
