पिंपरी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मावळ लोकसभा प्रवास दौरा, घर चलो अभियानाच्या निमित्ताने बुधवारी पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहेत. त्यापूर्वीच शहर भाजपामधील वाद उफाळला असून आमदार अश्विनी जगताप यांचा अवमान करणारे सरचिटणीस नामदेव ढाके यांच्यावर कारवाईची मागणी माजी शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी केली आहे. तसेच बावनकुळे यांनाही लेखी पत्र दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहरातील अनेकांना उंचीपेक्षा अधिक दिले. निःस्वार्थीपणे कित्येक रंकाचा राव केला. त्या परिसाने त्यांच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याचे सोनेच केले. मात्र, या सर्वांचा काहींना विस्मय झाला आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी आमदार अश्विनी जगताप यांचा अवमान करणाऱ्या कृतघ्न पदाधिकाऱ्यावर पक्षाने कारवाई करावी. दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत आमदार अश्विनी जगताप यांना बसण्यासाठीची खूर्ची एका बाजूला ठेवण्यात आली होती. पक्षाचे सरचिटणीस नामदेव ढाके यांनी जाणीवपूर्वक हा प्रकार केल्यानेच आमदार जगताप यांनी ढाके यांचा भर पत्रकार परिषदेत पानउतारा करून अचूक वेळ साधला.

हेही वाचा – जलतरण तलावांची सुरक्षा वाऱ्यावर…जाणून घ्या काय आहे स्थिती?

हेही वाचा – अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंबरोबर कसा? व्हायरल फोटोवर सुषमा अंधारे म्हणाल्या…

मी अश्विनी लक्ष्मण जगताप आहे. माझ्या नादी लागू नका, पाठीमागून वार करू नका, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे पक्षात फूट पाडण्याचा व अंतर्गत कलह माजवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्या ढाकेंचा भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी राजीनामा घ्यावा. आमदार अश्विनी जगताप यांनी घेतलेल्या या पावित्र्याचे आम्ही समर्थन करतो. त्यांनी जे केले ते योग्यच होते. आमदार अश्विनी जगताप यांच्यासोबत मी, शत्रुघ्न काटे व आमच्या सारखे हजारो कार्यकर्ते आहेत, असे वाकडकर म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before the visit of bjp state president chandrashekhar bawankule a dispute broke out in pimpri bjp pune print news ggy 03 ssb