पुणे : पुणे-कोलाड राष्ट्रीय महामार्गावरील भूगाव बाह्यवळण रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले असून या कामाच्या प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. पुढील नऊ महिन्यांत या बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) दिले. त्यामुळे चांदणी चौक ते भूगाव भागातील वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची सुटका होणार आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी रविवारी (१४ सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रलंबित आणि निर्धारित रस्ते विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी प्रलंबित असलेल्या भूगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामाबाबत त्यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम म्हणाले, ‘भूगाव बाह्यवळण रस्ता भूगाव ते परांजपे स्कीमकडे जाऊन २०० मीटर डावीकडे वळून मुख्य रस्त्यापर्यंत जाईल. या रस्त्याची एकूण लांबी ८६० मीटर असून, रुंदी १८ मीटर असेल. हा चार पदरी रस्ता असून, तो राष्ट्रीय महामार्ग (एनएच ७५३ एफ) जोडला जाईल. या कामासाठी मोहनलाल मतरानी कन्स्ट्रक्शन या कंपनीला १५ कोटी ३० लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. पावसाळ्यामुळे काम सुरू करण्यास विलंब होत असून, एका महिन्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. त्यापूर्वी मंजुरी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. सुमारे नऊ महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.’

‘या प्रकल्पासाठी एकूण १.६७ हेक्टर जमिनीचे भूसंपादन अपेक्षित असताना १.५५ हेक्टर (९५ टक्के) जमिनीचे भूसंपादन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) केले आहे. प्रकल्पातील ४१ बाधितांपैकी ३७ जणांनी पीएमआरडीएला भूसंपादनासाठी सहमती दर्शवली आहे. त्यानुसार भूसंपादनासाठी बाधितांना चटई क्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स – एफएसआय) आणि हस्तांतरण विकास हक्क (ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राइट्स – टीडीआर) यासारखे मोबदले देउन जमिनींचा आगाऊ ताबा घेण्यात आला आहे,’असेही कदम यांनी सांगितले.

या प्रकल्पामुळे पुणे शहराच्या वर्तुळाकार रस्ता आणि इतर महामार्गाच्या प्रकल्पाशी सुसंगती साधण्यात येईल. हा बाह्यवळण रस्ता शहराच्या एकूण वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणारा ठरेल. पावसाळा संपल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ मंत्री

रायगडकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग

भूगाव गावठाणातील रस्ता रुंद करण्यास मर्यादा असल्याने स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील स्थानिकांनी बाह्यवळण रस्त्याची मागणी केली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनीही गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार एनएचएआय आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्याकडून या प्रकल्पाला गती देण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे हा रस्ता रायगडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करेल, ज्यामुळे भूगाव गावठाण आणि भुकूम भागातील प्रवास सुकर होईल.