लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघातून ब्राह्मण समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी विविध ब्राह्मण संस्था-संघटनांनी केली आहे. त्यामुळे दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची आणि त्यातून भारतीय जनता पक्षही अडचणीत येण्याची शक्यता आहे. क्षीण झालेला ‘हिंदुत्वा’चा आवाज मजबूत करण्यासाठी ब्राह्मण समाजाला उमेदवारी मागण्यात आल्याचे संघटनांनी म्हटले आहे.

दीड वर्षांपूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व न दिल्याने ब्राह्मण समाज नाराज झाला होता. पोटनिवडणुकीत भाजपला हक्काच्या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला होता. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अद्यापही उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही. मात्र, त्यापूर्वीच ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, या आग्रही मागणीने जोर धरला आहे.

आणखी वाचा-देशात प्रथमच जैवविघटनशील बायोप्लॅस्टिकची निर्मिती! पुणेस्थित प्राज इंडस्ट्रीजला यश; जेजुरीत प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन

‘राज्यातील धर्म, जात आणि पंथ अशा सर्वच आघाड्यांवर यंदाची निवडणूक गाजण्याची शक्यता आहे. जातीनिहाय आरक्षणांमुळे जाती-पातींची अस्मिता अधिकच गडद झाली आहे. या परिस्थितीत हिंदुत्वाचा आवाज काहीसा क्षीण होण्यास सुरुवात झाली आहे. हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेऊन सकारात्मक काम करणारा राष्ट्रसमर्पित असा ब्राह्मण समाज आहे आणि या समाजाने नेहमीच हिंदुत्वाला साथ दिली आहे. राज्यातील राजकारण आणि समाजकारण पाहता भाजप आणि शिवसेना (शिंदे) या दोन्ही पक्षांनी कायम हिंदुत्वाची कास धरून सर्वसमावेशक धोरण अवलंबताना ब्राह्मण समाजाला प्राधान्य दिले आहे. ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचीही घोषणा झाली आहे. त्यामुळे राज्यातील ब्राह्मणबहुल किमान ३० विधानसभा मतदारसंघांत ब्राह्मण समाजाला उमेदवारी द्यावी,’ अशी मागणी करण्यात आली आहे.

या संघटनांकडून मागणी…

आम्ही सारे ब्राह्मण, परशुराम सेवा संघ, ब्राह्मण जागृती सेवा संघ, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, चित्पावन अस्तित्व संस्था, देशस्थ ऋग्वेदी शिक्षणोत्तेजक संस्था, याज्ञवक्ल्य आश्रम, कऱ्हाडे ब्राह्मण संघ, महाराष्ट्र ब्राह्मण सभा, स्वातंत्र्यवीर सावकर जयंती समिती, कृष्ण यजुर्वेदी तैतरीय संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन मध्यवर्तीय ब्राह्म मंडळ आणि अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थांकडून ही मागणी करण्यात आल्याची माहिती समन्वयक भालचंद्र कुलकर्णी यांनी दिली.

आणखी वाचा-बैठ्या जीवनशैलीमुळे जडतेय कायमची पाठदुखी! अस्थिविकारतज्ज्ञांनी सांगितले उपाय…

कसबा विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण समाजाची मोठी संख्या आणि ताकद आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघातील उमेदवारी देताना ब्राह्मण समाजातील व्यक्तीलाच द्यावी. यापूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व दिवंगत आमदार गिरीश बापट, मुक्ता टिळक, अण्णा जोशी, डॉ. अरविंद लेले यांनी केले आहे. त्याची दखल विशेषत: भाजपने घ्यावी. ब्राह्मण समाजाने कायमच भाजपला साथ दिली आहे, ही बाब लक्षात घेऊन या मागणीचा विचार व्हावा. -भालचंद्र कुलकर्णी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brahmin candidate wanted in kasba demand of various brahmin organizations pune print news apk 13 mrj