पुणे : मध्य रेल्वेने नवीन ‘पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक’ या ‘सेमी हायस्पीड’ मार्गासंबंधी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण केला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांने याबाबत आदेश दिला होता. कागदोपत्री त्रुटींची छाननी करून हा अहवाल आठवडाभरात रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. पुणे-नाशिक द्रुतगती प्रकल्प जुन्या मार्गानुसार करावा, अशी स्थानिक नागरिक आणि काही लोकप्रतिनिधींची भूमिका असताना डीपीआरचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

खोडद (ता.जुन्नर) येथील ‘जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) हा जागतिक दुर्बिण संशोधन प्रकल्प रेल्वेमार्गाला अडथळा ठरत आहे, म्हणून रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी ‘पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक’ या नवीन रेल्वे मार्गाबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे आदेश जानेवारी महिन्यात रेल्वे प्रशासनाला दिले होते. त्यानुसार मध्य रेल्वे विभागातील अभियंत्यांकडून सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून ‘डीपीआर’चे काम पूर्ण केले आहे.

कसा आहे नवीन अहवाल ?

नवीन ‘डीपीआर’नुसार पुणे-अहिल्यानगर रेल्वे मार्ग सध्याच्या महामार्गाला समांतर असणार आहे, तर शिर्डी ते नाशिक यासाठी नवीन मार्ग निश्चित केला जाणार आहे. त्यानुसार पुणे-नाशिक रेल्वे मार्गिकेचे अंतर २३५ किलोमीटर असून, पुणे ते अहिल्यानगर १२५ किमी, तर शिर्डी ते नाशिकमधील अंतर सुमारे ८२ किमी आहे. नव्या मार्गामुळे पुणे-नाशिक या दोन शहरांमधील प्रवासाच्या अंतरात पाऊण तास वाढ होण्याची शक्यता असली, तरी या मार्गात कोणताही अडसर नसल्याचे रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक या प्रस्तावित ‘सेमी हायप्सीड’ प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण झाला आहे. कागदोपत्री त्रुटी दूर करण्यात येत असून, दुरुस्तीअंती वरिष्ठांकडे हस्तांतरित करण्यात येईल. साधारणत: आठवडाभरात हा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल.- मोहित सिंग, उपमुख्य अभियंता, मध्ये रेल्वे, पुणे विभाग.

‘जुन्नर येथील ‘जीएमआरटी’ प्रकल्पाला धक्का न लावता किंवा अडचण निर्माण होऊ न देता उंचावरून किंवा बोगद्यातून रेल्वे मार्गिका पुढे घेऊन जाणे शक्य आहे. जुन्या प्रकल्पानुसार नाशिक, सिन्नर, शिर्डी भागातील अनेक बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन झाले आहे. औद्योगिक आणि भौगोलिकदृष्ट्या नोकरदारांबरोबर शेतमालाच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा आहे.- डाॅ. अमोल कोल्हे, खासदार

प्रकल्पाचा आढावा
एकूण अंतर – सुमारे २३५ किलोमीटर

एकूण खर्च – सुमारे १६ हजार कोटी
गती क्षमता – प्रति तास २०० किलोमीटर

प्रकल्पाचा कालावधी – साडेतीन वर्षे
एकूण स्थानके – २४ (१३ मोठी, ११ लघु)