पुणे : नवरात्रोत्सवात महिलांकडील दागिने हिसकावण्याचे सत्र सुरू आहे. कोथरूड भागात पादचारी महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.
याबाबत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूड भागातील शास्त्रीनगर परिसरात राहायला आहे. बुधवारी (२४ सप्टेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास महिला महात्मा सोसायटी परिसरातून निघाली होती. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पटारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली.
पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.
बालेवाडी भागात दोन दिवसांपूर्वी पादचारी महिलेकडील दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले होते. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पादचारी महिलांकडील दागिने हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.