भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तब्येतीची पुण्यातील संचेती रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. तसेच डॉक्टरांकडून सोमय्या यांच्या दुखापती आणि उपचार याची माहिती घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच केंद्राची सुरक्षा व्यवस्था नसती, तर किरीट सोमय्या यांना श्रद्धांजली वाहावी लागली असती, असं म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रकांत पाटील, “किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता. सोमय्या यांना मारण्याची पूर्ण तयारी झाली होती. हे गुंडाराज असून आज सोमय्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती. हल्ला झाले त्यावेळी पोलीस काय करत होते? किरीट सोमय्यांवर हल्ला करून काहीही होणार नाही. ही घटना लक्षात घेता पुणे पोलिसांनी ‘सुमोटो’ गुन्हा दाखल करावा. कारण ही दंगल आहे. निषेध शब्द बोथट असून आम्ही स्वस्थ बसणार नाही.”

“असे १०० जण खिशात घेऊन फिरतो”

“किरीट सोमय्या यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्यासोबत भविष्यातील गोष्टींवर चर्चा झाली. ते देखील या हल्ल्यांना घाबरत नाहीत आणि मी पण घाबरत नाही. असे १०० जण खिशात घेऊन फिरतो,” असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. तसेच सरकार भाजपा आमदार नितेश राणेंबाबतीत देखील सुडबुद्धीने वागत असल्याचा आरोप केला.

हेही वाचा : शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या संचेती रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले, “मानसिक धक्का बसल्याने…”

शिवाजीनगर पोलीस स्टेशनबाहेर भाजपा कार्यकर्त्याचं आंदोलन सुरू

दरम्यान, शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या हल्ल्याविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसह भाजपा कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन सुरू केलं आहे.

नेमकं काय घडलं?

किरीट सोमय्या शनिवारी (५ फेब्रुवारी) आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर सोमय्या तेथून पुणे महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन स्विकारण्याची मागणी केली. मात्र, सोमय्यांनी हे निवेदन स्विकारलं नाही. यावर आक्रमक शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.

व्हिडीओ पाहा :

शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी किरीट सोमय्यांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना तिथून बाजूला नेत गाडीत बसवले.

पोलिसांनी किरीट सोमय्या यांना गाडीत बसवल्यानंतरही आक्रमक शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवरही हल्ला चढवला. काही कार्यकर्ते गाडीच्या समोर आले, तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या मागच्या बाजूने हल्ला केला.

हल्ल्यावर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी स्वतः याची माहिती देत ट्वीट केलंय. ते म्हणाले, “माझ्यावर शिवसेनेच्या गुंडांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारात हल्ला केला आहे.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil allege attempt to murder of kirit somaiya in pune by shivsena svk 88 pbs