पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक उपचारही करण्यात आले. यानंतर संचेती हॉस्पिटलचे डॉ. पराग संचेती यांनी किरीट सोमय्या यांच्या प्रकृतीविषयी माध्यमांना माहिती दिली. यात त्यांनी अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सोमय्या यांना मानसिक धक्का बसल्याचं सांगितलं. संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर पराग संचेती म्हणाले, "किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेमध्ये जो हल्ला झाला त्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसलेला आहे. तसेच त्यांच्यावर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांचा रक्तदाब (BP) अचानक वाढला होता. संचेती हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केल्यानंतर त्यांचा बीपी सातत्याने वाढत होता. मात्र, आता बीपी कंट्रोलमध्ये आला आहे. त्यांना मानसिक धक्का बसल्यामुळे त्याचा बीपीवर परिणाम झाला." "पायऱ्यांवर पडल्याने किरीट सोमय्यांच्या उजव्या हाताला मुका मार" "या धक्काबुक्कीमध्ये किरीट सोमय्या महानगरपालिकेच्या पायर्यांवर पडले होते. ते पाठीवर पडले आणि त्यामुळे त्यांनी उजव्या हाताचा आधार घेतला होता. या उजव्या हाताला मुका मार लागलेला आहे. त्यांना एक दिवस संचेती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात येणार आहे," असंही डॉ. पराग संचेती यांनी नमूद केलं. नेमकं काय घडलं? किरीट सोमय्या शनिवारी (५ फेब्रुवारी) आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर सोमय्या तेथून पुणे महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन स्विकारण्याची मागणी केली. मात्र, सोमय्यांनी हे निवेदन स्विकारलं नाही. यावर आक्रमक शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. व्हिडीओ पाहा : शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी किरीट सोमय्यांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना तिथून बाजूला नेत गाडीत बसवले. पोलिसांनी किरीट सोमय्या यांना गाडीत बसवल्यानंतरही आक्रमक शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवरही हल्ला चढवला. काही कार्यकर्ते गाडीच्या समोर आले, तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या मागच्या बाजूने हल्ला केला. हल्ल्यावर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया हेही वाचा : “जवळपास २०० RTI, कागदपत्रे शोधायला १२३ दिवस लागले”, किरीट सोमय्यांचा पुण्यात जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी स्वतः याची माहिती देत ट्वीट केलंय. ते म्हणाले, “माझ्यावर शिवसेनेच्या गुंडांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारात हल्ला केला आहे.”