पुणे : ‘सेनासाहेब सुभा श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रामध्ये आणून आपल्या गौरवशाली इतिहासाशी नवीन पिढीला जोडण्याची भूमिका राज्य सरकारने यशस्वी पार पाडली आहे. भावी पिढीला इतिहासाची ओळख व्हावी, म्हणून मराठा साम्राज्याच्या खुणा आणि वारसा परत मिळवण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूरकर भोसले घराण्याचा इतिहास हा समृद्ध, पराक्रमी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. या वेळी ‘कृष्णा पब्लिकेशन्स’तर्फे प्रकाशित, वा. गो. आपटे आणि यशोधन जोशी लिखित ‘मराठ्यांचा दरारा – नागपूरकर भोसलेंच्या बंगाल प्रांतावरील मोहिमा’ या पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार, श्रीमंत राजे रघुजी भोसले यांचे वंशज श्रीमंत राजे मुधोजी भोसले, आमदार राणाजगजितसिंह पाटील, डॉ. संजय कुटे, संजय उपाध्याय, श्रीकांत भारतीय, डॉ. किरण कुलकर्णी, मीनल जोगळेकर, पुस्तकाचे लेखक यशोधन जोशी, प्रकाशक चेतन कोळी आदी यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘नागपूरकर भोसले घराण्याचा इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. युनेस्को मान्यताप्राप्त १२ किल्ले, छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे यांसारख्या ऐतिहासिक वारशांद्वारे आपण आपल्या इतिहासाशी पुन्हा जोडले जात आहोत. सांस्कृतिक विभागाचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मराठा साम्राज्याच्या खुणा आणि वारसा परत मिळवण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील. यामुळे हिंदवी स्वराज्याचा गौरवशाली इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.’

पुस्तकाचे लेखक जोशी म्हणाले, ‘इंदूरच्या वासुदेव गोविंद आपटे यांचे १९१६ मधील ‘मराठ्यांचा दरारा’ हे पुस्तक आणि गंगाराम या कवीच्या ‘महाराष्ट्र पुराण’ या बंगाली काव्याच्या इंग्रजी अनुवादाचा आधार घेऊन हे पुस्तक नव्याने प्रकाशित केले आहे. मे २०२५ मध्ये रघुजी भोसले यांच्या तलवारीच्या लंडनमधील लिलावाची माहिती मिळाली आणि महाराष्ट्र शासनाने ती तलवार परत आणली. हा योगायोग या पुस्तकाच्या प्रकाशनाला विशेष महत्त्व देतो.’