पिंपरी : विधानसभेची २०१९ ची निवडणूक शिवसेना-भाजप युतीमध्ये लढलो. पण, सत्तेच्या मोहापायी शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधली. दोन अडीच वर्षे विकासकामे ठप्प होती. हट्टापायी अनेक प्रकल्प बंद पाडले होते. लोकांमध्ये नैराश्य होते. त्यासाठी आम्हाला मोठा कार्यक्रम करावा लागला. आम्ही लोकांच्या मनातील निर्णय घेतला, अशी जनतेची भावना असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिंचवड मतदारसंघात रोड-शो काढला. सुमारे अडीच तास हा रोड शो चालला.रोड शोनंतर रहाटणी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. आरोग्यमंत्री तानाजी सावंत, शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री विजय शिवतारे, भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार भरत गोगावले, आमदार उमा खापरे, भाजप प्रवक्ते एकनाथ पवार, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अंधेरीप्रमाणे निवडणूक बिनविरोध होईल असे वाटले होते. एखाद्याचे निधन झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. आम्ही विनंती केल्यानंतरही चिंचवडची निवडणूक बिनविरोध झाली नाही. मतदारांचा कल पाहिल्यानंतर भाजप उमेदवाराचा विजय निश्चित आहे.पिंपरी-चिंचवडमधील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शहरातील बांधकामांना लावण्यात आलेला शास्तीकर माफ करण्याचा निर्णय विधानसभेत घेतला आहे. त्याचा शासन आदेश तातडीने निघेल. अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नांवर आता मोर्चा काढावा लागणार नाही. हा प्रश्न ठाण्याप्रमाणे कायमचा निकालात काढला जाईल. सिडकोप्रमाणे प्राधिकरणाचा साडेबारा टक्क्याचा विषय तातडीने मार्गी लावला जाईल. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. इंद्रायणी, पवना नदी सुधार प्रकल्प आराखडा तयार करायला सांगितला आहे. पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोला मंजुरी देण्याची सूचना केली आहे. पुणे रिंगरोड लवकरच सुरू करू, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.