पिंपरी: गुढीपाडव्या निमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवरून त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. राज ठाकरे यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम विरोधात भूमिका घेतली. तसेच हे बांधकाम एका महिन्यात न हटवल्यास त्याठिकाणी गणपती मंदीर बांधू, असा इशाराही त्यांनी दिला होता. तेव्हा राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे हिंदू – मुस्लिम दंगल घडू शकते असं म्हणत राज ठाकरे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असा तक्रार अर्ज पिंपरी- चिंचवडमधील वाकड पोलिसांत वाजीद रजाक सय्यद यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या तक्रार अर्जात त्यांनी म्हटलं आहे की, राज ठाकरे यांनी मुस्लिम धार्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे हिंदू- मुस्लिम तणाव निर्माण होऊ शकतो. राज ठाकरे यांनी राजकीय पोळी भाजण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित सभेत भडकाऊ भाषण केले आहे. मुस्लिम धर्मियांच्या भावनांना ठेच पोहचेल असे शब्द वापरण्यात आले आहेत. त्यांनी केलेलं भाषण हे राजकीय दबवातून केले आहे.

आणखी वाचा- माहीमच्या समुद्रातल्या ‘त्या’ बांधकामावर प्रशासनाकडून कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनंतर पालिकेचं मोठं पाऊल!

अशा वक्तव्यांमुळे देशभर दंगली होऊ शकतात, यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, राज ठाकरे यांच्या आगामी सभांना परवानगी देऊ नये, या तक्रारीनंतर माझ्या जीवाला धोका होऊ शकतो, तसं झाल्यास त्याला राज ठाकरे जबाबदार असतील असंही या तक्रारवाजीद रजाक सय्यद यांनी अर्जात नमूद केलं आहे.

भाषणात काय म्हणाले होते राज ठाकरे

गुढीपाडव्या निमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी हिंदुत्वाबाबत आपली भूमिका मांडली. त्यासाठी त्यांनी थेट जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन दहशतवादाबाबत मांडलेल्या भूमिकेचाही संदर्भ दिला. “मला धर्मांध हिंदू नकोय, मला धर्माभिमानी हिंदू हवाय”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“मला लोकांनी विचारलं, तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय? हिंदू म्हणून तुम्ही कुणाला बघता? मी म्हटलं मला धर्मांध हिंदू नकोय. मला धर्माभिमानी हिंदू हवाय. जो दुसऱ्याच्या धर्माचाही मान राखेल. मला माणसं हवी आहेत. मुस्लीम धर्मातलीही माणसं मला हवी आहेत. पण ती माणसं जावेद अख्तरांसारखी असायला हवीत”, असं राज ठाकरे म्हणाले.

“मला अपेक्षित असलेला मुसलमान कसा असला पाहिजे? पाकिस्तानला सुनावणारा, तशी हिंमत असणारा मुसलमान मला पाहिजे. त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांना सुनावलं आहे. तिथे त्यांच्या लोकांसमोर जाऊन त्यांना सांगायचं की आमच्या शहरावर झालेला हल्ला आम्ही विसरणार नाही. अशी माणसं मला अपेक्षित आहेत”, असं राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.

माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर राज ठाकरेंनी घेतला आक्षेप

मनसेच्या पाडवा मेळाव्यात पुन्हा एकदा राज ठाकरेंनी एक व्हिडीओ दाखवून विद्यमान एकनाथ शिंदे सरकार, मुंबईचे पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्त यांना इशारा दिला. हा व्हिडीओ माहीमसमोरच्या समुद्रातला असून तिथे एक अनधिकृत बांधकाम उभं राहिल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. व्हिडीओवरून ते बांधकाम म्हणजे कुणाचीतरी समाधी असल्याचं वाटत असून राज ठाकरेंनी या गोष्टीवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. तसेच, राज्य सरकारला इशाराही दिला आहे.

आणखी वाचा- “राज ठाकरेंनी मुद्दा उपस्थित केला अन् शिंदे-फडणवीस सरकारने…”; माहीम कबरीच्या वादावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

“इथे मकदूम बाबाचा दर्गा आहे. त्याच्यासमोर समुद्रात अनधिकृतरीत्या उभं केलं गेलेलं ते बांधकाम आहे. त्याचे सॅटेलाईट फोटोही मी पाहिले आहेत. तिथे काहीही नव्हतं. माहीम पोलीस स्टेशन जवळ आहे. पण त्यांचं लक्ष नाही. महानगर पालिकेचे लोक फिरत असतात. पण त्यांनी पाहिलं नाही. दिवसाढवळ्या तुमच्या डोळ्यांसमोर समुद्रात नवीन हाजीअली तयार करत आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.

“प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, पोलीस आयुक्तांना, पालिका आयुक्तांना मी आजच सांगतो. महिन्याभराच्या आत जर त्यावर कारवाई झाली नाही, हे तोडलं गेलं नाही तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर आम्ही उभं केल्याशिवाय राहणार नाही. मग काय व्हायचं ते होऊन जाऊ देत.अशा प्रकारे कुणालाही सवलती देत बसाल, कुणाकडेही दुर्लक्ष करणार असाल, तर आमच्याकडेही दुर्लक्ष करा. वाट्टेल ते फाजील चाळे चालू देणार नाही”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी राज्य सरकारसह पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनालाही इशारा दिला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint filed against raj thackeray in pimpri kjp 91 mrj
Show comments