पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटत बारामतीमधून निवडणूक लढविण्याची घोषणा करून माघार घेणाऱ्या पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्याविरोधात सासवडमध्ये टीका सुरू झाली आहे. त्यासंर्भातील एक निनावी पत्र समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आले असून शिवतारे यांच्यावर टीका करतानाच पवार विरोधी ५ लाख ८० हजार मतदारांनी आता नेमके करायचे काय?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आमचा नेता पलटूराम निघाला, असा आरोपही होत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

बारामती कोणाचा सातबारा नाही, असे सांगत पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. अजित पवार यांच्यावर सातत्याने कडवट टीका करणाऱ्या शिवतारे यांचे बंड थंड झाले आहे. माझ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास नको, म्हणून निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला जाईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर टीका करणारे निनावी पत्र प्रसिद्ध झाले आहे.

हेही वाचा >>>पुणे : कोथरूडमध्ये पोपट विकणारे तिघे अटकेत, दोन पोपट वन विभागाकडून जप्त

अजित पवार यांच्यासारखा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केला. या पापाचे परिमार्जन मतदारांनाच करावे लागणार आहे. या रामायणातला रावणाच्या विरोधात लढणारा रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे आहे, अशी टीका शिवतारे यांनी केली होती. त्यामुळे आता अजित पवार यांचा साक्षात्कार झाला आहे का, तुम्ही रामायणातले बिभीषण आहात की नाही, याचे उत्तर द्या. पवारांच्या विरोधातील ५ लाख ८० हजार मतदारांनी आता नेमके काय करायचे, याचेही उत्तर शिवतारे यांनी द्यावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचा पलटूराम, पुरंदरचा मांडवली सम्राट, घूमजाव, शिवतारे जमींपर, चिऊतारे, शेवटी आपला आवाका दाखविला, पन्नास खोके अन् शिवतारे ओके, अशा खोचक प्रतिक्रिया समाजमाध्यमातून उमटत असल्याचेही या पत्राद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.