पिंपरी : सिमकार्डवर २० तक्रारी आल्याचे सांगून आणि मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात अटकेची भीती दाखवून दाम्पत्याची दोन दोन कोटी १४ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार निगडी प्राधिकरण परिसरात उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी पाच मोबाइल नंबरवरून बोलणाऱ्या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ७० वर्षीय जेष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पोलीस अधिकारी असल्याचे सांगून या दांपत्याला फोन केला. त्यांच्या पत्नीच्या नावाने घेतलेल्या सिमकार्डवर २० गुन्हे झाल्याचे, मनी लॉन्ड्रिंगमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे सांगत दहशत निर्माण केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट आदेश, पीडीएफ फाइल पाठवत पडताळणीच्या (व्हेरिफिकेशन) निमित्ताने विविध बँक खात्यांमध्ये दोन कोटी १४ लाख रुपय ७० हजार ३५८ रुपये भरण्यास भाग पाडले. या प्रकरणी सायबर पोलीस तपास करत आहेत.
बनावट कागदपत्रांद्वारे विमा कंपनीची २३ लाखांची फसवणूक
रुग्णांच्या नावाने बनावट विमा कागदपत्र तयार करून ती विमा कंपनीला सादर केली. त्यानुसार विमा कंपनीकडून २२ लाख ९६ हजार रुपये घेत फसवणूक केली. ही घटना तळेगाव दाभाडे परिसरातील एका रुग्णालयात घडली. याप्रकरणी दोन डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३६ वर्षीय डॉक्टरने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर हे एका कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. आरोपी डॉक्टर हे तळेगाव येथील एका रुग्णालयात कार्यरत आहेत. आरोपी डॉक्टरांनी आपसांत संगनमत करून १२ मार्च २०२५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विविध रुग्णांच्या नावाने बनावट आरोग्यदावे तयार करून ते विमा कंपनीकडे सादर केले.
रुग्णालयाच्या नावाने उघडलेल्या बँक खात्यावर विमा दाव्यांची रक्कम जमा होत होती. या खात्यावर तब्बल २२ लाख ९६ हजार ३५ रुपये स्वीकारले गेले. कंपनीची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रकरण समोर आले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.
पत्नीकडे बघितल्याच्या संशयातून एकावर वार
‘माझ्या बायकोकडे का बघतोस’ अशी विचारणा करत एकावर धारदार शस्त्राने वार केला. ही घटना तळेगाव दाभाडे परिसरात घडली. याबाबत एका ४७ वर्षीय व्यक्तीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ४५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कामासाठी मजूर बघून पुन्हा आपल्या घरी चालले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. ‘माझ्या बायकोकडे का बघतोस? आता तुझा हिशोबच करतो’ असे म्हणत आरोपीने त्यांना ढकलून खाली पाडले. नंतर घरातून धारदार हत्यार आणून फिर्यादी यांच्या डोक्यावर दोन वेळा वार केला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.
कासारवाडीत जुन्या भांडणातून चाकूने हल्ला
जुन्या वादातून दोन तरुणांनी मिळून मटण विक्रेता आणि त्याच्या मित्रावर चाकू व मद्याच्या बाटलीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (१६ नोव्हेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास कासारवाडीतील केशवनगर भागात घडली.
अल्लमेश उर्फ पापा शब्बीर कुरेशी (२३, खडकी बाजार, पुणे) आणि त्याचा साथीदार दिपक सौरभ मिसाळ उर्फ डुन्या (२१) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. शाहीद सिराज कुरेशी (२५, केशवनगर, कासारवाडी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीद यांचा चुलत भाऊ अल्लमेश याच्यासोबत जुने भांडण आहे. रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी शाहीद हे त्याचा मित्र ओमकार याच्यासोबत दुचाकीवरून जात होते. त्यावेळी एका हॉटेलच्या पाठीमागे आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवले. जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन्ही आरोपींनी शाहीद कुरेशी यांना शिवीगाळ करत चाकूने गालावर, कानामागे आणि हातावर वार केले. तसेच त्यांचा मित्र ओमकारच्या डोक्यावर व तोंडावर बिअरची बाटली फोडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. दापोडी पोलीस तपास करत आहेत.
बुलेटला धक्का लागल्याने टोळक्याकडून कुटुंबास मारहाण
दुचाकीचा बुलेटला धक्का लागल्याच्या कारणावरून १४ जणांच्या टोक्याने एका कुटुंबास मारहाण केली. तसेच दगडफेक करत खिडकीच्या काचाही फोडल्या. ही घटना मुळशी तालुक्यातील भुकूम रोडवर घडली. याबाबत २७ वर्षीय तरुणाने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १४ जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुकूम येथील सार्वजनिक रस्त्यावर फिर्यादीच्या दुचाकीचा धक्का आरोपीच्या बुलेट बाईकला लागला. या कारणावरून त्यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. यावेळी चिडलेल्या आरोपींनी आपल्या साथीदारांना बोलवत फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी फिर्यादी यांच्या घराच्या खिडकीवर दगडफेक करून काच फोडून नुकसान केले. बावधन पोलीस तपास करत आहेत.
टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
टेम्पोची धडक दुचाकीला लागून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मोशीत घडली. अपघातानंतर चालक टेम्पो सोडून पळून गेला. संगीत प्रल्हाद काळजे (४८) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीत काळजे हे दुचाकीवरून भाजी खरेदीसाठी मोशी येथे जात होते. भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने संगीत यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धक्क्याने ते खाली पडले असता टेम्पोच्या मागील चाकाखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाने टेम्पो रस्त्याच्या कडेला सोडून पळ काढला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
दोन दुचाकींची धडक; दोघे जखमी
भरधाव वेगातील एक दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. ही घटना चिंचवड येथील चापेकर चौकात घडली. याबाबत जखमी झालेल्या २७ वर्षीय तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मित्रासह दुचाकीवरून चालले होते. ते चिंचवडगावातील चापेकर चौकात आले असता त्यांच्या दुचाकीला आरोपी चालवत असलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी आणि त्यांचा मित्र हे दोघेजण जखमी झाले. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
हिंजवडीत पिस्तुलासह तरुणास अटक
पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. हिंजवडी येथे ही कारवाई करण्यात आली. इस्माईल उर्फ नादील करीम शेख (वय २३, रा. कोयतेवस्ती, पुनावळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई ओमप्रकाश श्रीरंग कांबळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्माईल संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता आरोपी इस्माईल याच्याकडे ३५ हजार रुपयांचे एक गावठी पिस्तुल व एक हजार रुपये किंमतीची दोन जिवंत काडतुसे सापडली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
