पुणे : ‘ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याबाबतची बाब पक्षांतर्गत आहे. ती पक्ष पातळीवर सोडविली जाईल,’ असे सांगून उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भुजबळ यांच्याबाबत सावध भूमिका घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याच्या मंत्रिमंडळात ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यावरून भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ओबीसी समाजानेही आक्रमक भूमिका घेतली होती. त्यातच भुजबळ यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे भुजबळ यांची पुढील भूमिका काय असेल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांच्याकडे त्यासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही पक्षांतर्गत बाब असल्याचे सांगत त्यासंदर्भात बोलण्यास नकार दिला. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पक्षांतर्गत विषय आहे. तो आमचा आम्ही सोडवू,’ असे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा >>> भुजबळ यांना राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यासाठीच मंत्रिमंडळात स्थान नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

वाहतूक कोंडीवर दर पंधरा दिवसांनी बैठक

पुणे : ‘शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसंदर्भात नियोजन करण्यासाठी दर पंधरा दिवसांनी बैठक घेतली जाईल. त्यामध्ये सर्व विभागांतील अधिकारी उपस्थित असतील. शहरातील केईएम रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने महापालिकेने रुग्णालयाला दुसरी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. पुण्यातील एका बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm ajit pawar refused to comment on bhujbal meeting with fadnavis pune print news apk 13 zws