पुणे : ‘मराठवाड्याने अनेक संतांचे कार्य पाहिले. ‘एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ असे कार्य करणारी माणसे इथे उभी राहिली. महाराष्ट्राच्या जडणघडणीत सुरुवातीपासूनच मराठवाडा अग्रेसर होता. मराठी स्वतःच्या हक्कांसाठी ही मराठवाड्याने कधी भांडण मांडले नाही. मात्र, मराठवाड्याकडे कायम दुर्लक्षच होत गेले,’ अशी खंत मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी शनिवारी व्यक्त केली. ‘एकेकाळी वैभवसंपन्न असलेल्या मराठवाड्यात आता इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. गोदावरीचे पाणी प्यायलेला मनुष्य मागे राहणार नाही. मराठवाड्याला मागास समजण्याचे कोणतेही कारण नाही. आपण मागासलेले नाहीत,’ असेही त्यांनी सप्ष्ट केले.
मराठवाडा पुण्यभूषण सोहळा समितीच्या वतीने आयोजित ‘मराठवाडा पुण्यभूषण पुरस्कार’ वितरण सोहळ्यात डॉ. देगलूरकर बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे, समितीचे ॲड. दादासाहेब भोईटे, ॲड. अविनाश कामखेडकर या वेळी उपस्थित होते. मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांना ‘मराठवाडा पुण्यभूषण पुरस्कारा’ने गौरविण्यात आले, तर सातारा-सांगली जिल्हा तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष प्रमोद गिरिगोस्वामी, अकोल्याचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ऋषिकेश सारूक, फॅमिली कोर्ट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. गणेश कवडे, साहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. धैर्यशील गाढवे आणि ॲड. मोनाली काळे-शिंदे, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. विश्वजित पाटील, माजी उपाध्यक्ष ॲड. पवन कुलकर्णी आणि सचिव ॲड. भाग्यश्री गुजर-मुळे यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
‘सातवाहन काळापासून ते यादवांच्या काळापर्यंत जितके राज्यकर्ते झाले, त्या सर्वांच्या राजधान्या मराठवाड्यात होत्या. ‘यथा राजा, तथा प्रजा’ या उक्तीप्रमाणे त्यांनी निर्माण केलेली संस्कृती संपूर्ण महाराष्ट्राभर पसरली. एकेकाळी वैभवसंपन्न असलेल्या मराठवाड्यात आता इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे,’ असे डॉ. देगलूरकर यांनी सांगितले.
ते म्हणाले,‘या देशाला मराठवाड्याने अनेक कर्तृत्ववान माणसे दिली आहेत. त्यात गुजरात राज्याच्या किनारपट्टीवरील लोथल आणि बेट द्वारका यांच्यासारख्या महत्वाच्या पुरातत्व स्थळांचा शोध लावणारे एस. आर. राव यांच्यासारख्या व्यक्तींचा समावेश होतो. अशी अनेक रत्ने मराठवाड्याने दिली आहेत. त्यामुळे मराठवाड्याला मागास समजण्याचे कोणतेही कारण नाही. आपण मागासलेले नाहीत.’
‘सोन्याचा भाव आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. मात्र, लोकांच्या आयुष्याचे सोने करणारा भाऊसाहेब जाधव यांच्यासारखा परिसस्पर्श हवा आहे,’ अशी भावना डिगे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,‘जाधव यांनी अनेक विद्यार्थ्यां आयुष्यात रंग भरले. सर्व प्रकारची मदत करून त्यांच्या आयुष्याला आकार दिला. जाधव यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत पुण्यासारख्या शहरात आपले अस्तित्व निर्माण केले, मराठवाड्यातील अनेकांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी त्यांना आधार दिला. प्रत्येकाला मदत करण्याची तयारी आणि प्रचंड सकारात्मकता यांचा संगम जाधव यांच्यात आहे.’ राम माने यांनी प्रास्ताविक केले. सुजाता शेणई यांनी सूत्रसंचालन केले.
‘संस्थांनी बांधिलकी जपण्याची गरज’
‘सामाजिक आणि शैक्षणिक संस्था या समाजाच्या रक्तवाहिन्या आहेत. जिथे सरकारी योजना पोहचत नाहीत, तिथे पोहचण्याचे का. या संस्था करत असतात. संस्थाचालकांनी एका उद्देश ठेवून काम करण्याची गरज आहे. शिक्षण ही बांधिलकी समजून काम करणाऱ्या अत्यंत कमी संस्था आहेत. सामाजिक-शैक्षणिक संस्थांनी समाजाची बांधिलकी जपण्याची गरज आहे,’ असे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे म्हणाले.