पुणे : सोलापूर येथे हिंदू संघटनांकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता,त्यावेळी यंदाच्या दिवाळीमध्ये हिंदूकडूनच खरेदी करा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी वादग्रस्त विधान केले. यावरून आरोप प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली. त्याच वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौर्यावर होते. त्यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानाबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, संग्राम जगताप यांनी अतिशय चुकीचे विधान केले आहे, आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविणार आहोत.
एकदा पक्षाचे ध्येय धोरण ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून कुठलाही खासदार, आमदार, संबधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची जर वक्तव्य करत असतील, तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नसल्याची भूमिका अजित पवार यांनी यावेळी मांडली.
तसेच ते म्हणाले, ज्यावेळी अरुण काका जगताप हयात होते तोपर्यंत सर्व सुरळीत होत, परंतु आता काही लोकांची आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे. आपल्यावर वडिलांचं छत्र राहिलेलं नाही, त्यामुळे आपण जबाबदारीने वागलं पाहिजे आणि बोललंदेखील पाहिजे.
तसेच मी मध्यंतरी एका कार्यक्रमाकरिता गेलो होतो, त्यावेळी बोलण्याबाबत सूचना केल्या होत्या आणि मी नक्की सुधारणा करेन असे त्यांनी सांगितले होते, पण ते सुधारणा करताना दिसत नाहीत; त्यामुळे त्यांचे विचार आणि भूमिका ही पक्षाला मान्य नाहीत, त्यामुळे पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.