पुणे : वडगाव शेरीचे आमदार म्हणून काम करताना सुनील टिंगरे यांनी येथे अनेक विकासाची कामे केली, प्रकल्प केले. मात्र अलीकडच्या काळात कोणतेही कारण नसताना टिंगरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न काही व्यक्तींकडून केला जात आहे. कोणतीही चूक नसताना जनमाणसात प्रतिमा डागळण्यासाठीची वक्तव्य योग्य नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टिंगरेंची पाठराखण केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वडगाव शेरी मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या पुण्यातील पहिल्या ऑक्सिजन पार्क उद्यानाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे, राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर , पालिका आयुक्त राजेंद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा…भाजपने ब्राह्मण समाजाला गृहीत धरू नये, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचा इशारा; विधानसभेसाठी ‘इतक्या’ जागांची मागणी

गेल्या आठवड्यात वडगावशेरी मतदारसंघात जाहीर सभेच्या निमित्ताने आलेले ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार टिंगरे यांच्यावर टीका केली होती. या परिसरात टिंगरे यांचे फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यावर दमदार आमदार असा उल्लेख होता. त्यावरून शरद पवार यांनी पोर्श कार अपघात प्रकरणात आरोपीला मदत व्हावी, म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दबाव टाकणारा ‘दिवटा आमदार’ अशा शब्दांत टिंगरेंवर टीका केली होती. या भागातील मतदार तुझा बंदोबस्त करतील, अशी टीका केली होती. गुन्हेगारांना मदत करणारा हा दमदार आमदार असेही शरद पवार म्हणाले होते.

शरद पवार यांनी केलेल्या टीकेचा धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेल्या प्रकल्पांची यादी वाचून दाखवित टिंगरे यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. या भागात जीएसटी भवन, भव्य गार्डन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विश्रांतवाडी चौकात ग्रेड सेप्रेटर अशा कामांची यादीच उपमुख्यमंत्री पवार यांनी वाचून दाखविली. सर्वांना बरोबर घेत, एकत्र काम करणाऱ्याला आमदार टिंगरे यांना कारण नसतानाही बदनाम केले जात असल्याचे अजित पवार म्हणाले. चुकीचे आरोप करत जनमाणसात प्रतिमा डागळण्याचे काम काही व्यक्ती करत असल्याची टीका अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.

हे ही वाचा…नशिले शहर !

आमदार टिंगरेंना पाच वर्षांसाठी निवडून दिले. त्यातील एक वर्षे विरोधी पक्षात गेले, एक वर्षे कोरोनात गेले. उर्वरित तीन वर्षांत महायुतीच्या काळात ही कामे केली आहेत. धडाकेबाज आमदार म्हणून टिंगरेंची ओळख आहे. पुढील पाच वर्षांत वडगावशेरीकरांनी संधी दिल्यास यापेक्षा अधिक मोठे प्रकल्प या भागात पूर्ण होतील, असेही अजित पवार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister ajit pawar supported tingre and condemned attempt to defame him pune print news ccm 82 sud 02