पुणे : शहरातील वाडिया महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शाखा उद्घाटनाच्या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पत्रक लावल्यावरून दोन्ही संघटनांमध्ये वाद झाला. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे मंगळवारी (१४ ऑक्टोबर) पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.

‘मनविसेचा वाडिया महाविद्यालयात सोमवारी शाखा उद्घाटन कार्यक्रम होता. त्यावेळी अभाविपचे फलक भिंतीवर लावण्यात आले होते. त्यात इतर संघटनांना दुय्यम लेखण्यात आले होते. याबाबत संबंधित पोस्टर लावून वातावरण दूषित करणाऱ्या व्यक्तीवर कारवाईची मागणी मनविसेने कोरेगाव पोलीस ठाण्यात केली. मात्र, पोलिसांनी दाद दिली नाही. त्यामुळे मनविसेच्या कार्यकर्त्यांनी सदाशिव पेठेतील अभाविपच्या मुख्य कार्यालयात मनविसेचे फलक लावले. तसेच, कार्यालयाला कुलूप लावण्यात आले,’ अशी माहिती मनविसेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी दिली.

‘मनविसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पेरूगेट पोलीस चौकी येथे केली. स्वत:चे राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी ‘स्टंटबाजी’ करणाऱ्या मनविसेचा निषेध आहे. या प्रकरणी महाविद्यालयातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून कारवाई करावी,’ असे अभाविपचे पुणे महानगर मंत्री राधेय बाहेगव्हाणकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे नमूद केले.