पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडमध्ये क्रूरपणे लाकडी दंडक्याने बेदम मारहाण करून श्वानाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने पाळीव श्वानाची हत्या केल्याने प्राणीमित्रांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
आकुर्डी येथील पेट्रोल पंपाजवळ हस्की नावाच्या श्वानाची शनिवारी हत्या करण्यात आली. हस्की रुक्मिणी गलांडे यांनी तक्रादर राहुल सदाशिव मारकर यांना काही दिवस सांभाळण्यासाठी दिला होता. परंतु, अज्ञात व्यक्तीने हस्की (श्वान) चा अक्षरशः लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या जबर मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या श्वानाचा मृत्यू झाला आहे.
मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह फरफटत रस्त्यावर नेण्यात आला. अत्यंत क्रुरतेने श्वानाला मारहाण करून हत्या केल्याने प्राणीमित्रांमध्ये संताप आहे. या प्रकरणी निगडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बी.एन.एस कलम ३२५, प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम नुसार हा गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती निगडी पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ यांनी दिली आहे.