पुणे शहरात वैद्यकीय उपचार, तसेच शिक्षणासाठी मोठ्या संख्येने परदेशी नागरिक वास्तव्यास येतात. परदेशी नागरिकांवर लक्ष ठेवण्याचे काम पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून करण्यात येते. बेकायदा वास्तव्य, तसेच देशविरोधी कारवायांवर तपास यंत्रणांची बारकाईने नजर असते. परदेशी नागरिकांकडे संशयाने पाहिले जाते. अशा परिस्थितीत सजगता महत्त्वाची असून, काही अनुचित आढळून आल्यास पोलिसांकडे माहिती द्यावी.
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर तातडीने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला. तेव्हा पुणे शहरात १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुणे पोलिसांनी गेल्या वर्षी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ५३ परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची मायदेशी रवानगी केली. गेल्या तीन वर्षांत पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ८६ परदेशी नागरिकांची मायदेशी रवानगी केली आहे. पुणे शहरात मोठ्या संख्येने परदेशांतील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात.
आफ्रिकीसह आखाती देशांतील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरात आखाती देशांतील नागरिक मोठ्या संख्येने वैद्यकीय उपचारासाठी दाखल होतात. आखाती देशांच्या तुलनेत पुण्यात चांगल्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा मिळतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शहरात उपचारासाठी दाखल होणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वैद्यकीय उपचारासाठी व्हिसा मिळवून परदेशी नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास येतात. पुण्यात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. परदेशातील नागरिकांचा राबता शहरात वाढलेला आहे. परदेशी नागरिकांची व्हिसाची मुदत, त्यांच्या येण्यामागचे कारण, तसेच त्यांच्या वास्तव्याची माहिती पोलिसांना द्यावी लागते.
वैद्यकीय उपचार, शिक्षण, व्यावसायिक कामासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांना सर्व बाबींची पूर्तता करावी लागते. मात्र, त्यापेक्षा खरे संकट आहे, ते देशात बेकायदा वास्तव्य करणारे; तसेच देशात राहून शत्रूराष्ट्राला गोपनीय माहिती पुरविणाऱ्यांचे. पुणे शहरात हेरगिरीचा प्रकार उघडकीस आला तो नव्वदच्या दशकात.
सईद अहमद मोहम्मद देसाई मूळचा कराचीचा रहिवासी. त्याची पत्नी कोल्हापूरची होती. विवाहानंतर सासुरवाडीला त्याचे येणे-जाणे वाढले. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा (आयएसआय) तो हस्तक म्हणून काम करू लागला. बनावट कागदपत्रांद्वारे शहरात वास्तव्य करू लागता. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एका सोसायटीत त्याने सदनिका भाडेतत्त्वावर घेतली. त्याने वाहन परवाना, शिधापत्रिका, तसेच भारतीय पारपत्रदेखील मिळविले होते. सुकामेव्याचा व्यापारी म्हणून तो व्हिसा मिळवून तो आला होता.
व्हिसाची मुदत संपल्यानंतर तो देशात वास्तव्य करत होता. त्याला मुलेही झाली होती. त्याने बनावट जन्मदाखले करून घेतले होते. पुणे शहरात लष्कराचे दक्षिण मुख्यालय, तसेच विविध लष्करी संस्था आहेत. देसाईने हेरगिरी करून गोपनीय माहिती पुरविली होती. दि. १४ जून १९९९ ला पुणे पोलीस दलातील निरीक्षक सुरेंद्र बापू पाटील यांना एक खास माहिती मिळाली. पुण्यात बनावट नावाने देसाई वास्तव्य करत असून, तो मूळचा पाकिस्तानी आहे. तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा हस्तक म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडले.
सहकारनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. शिक्षा भोगल्यानंतर त्याला मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. दि. २३ जानेवारी २००८ रोजी तो सहकारनगर पोलीस ठाण्यातून पसार झाला. कोलकातामार्गे तो बांगलादेशात पसार होणार होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने त्याला कोलकात्यातून अटक केली होती. त्यानंतर पंजाबमधील वाघा सीमेवरून त्याची रवानगी पाकिस्तानात करण्यात आली होती.
लष्कराच्या संशोधन आणि विकास संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप कुरुलकर याला पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. डाॅ. कुरुलकर समाजमाध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील एका महिलेच्या संपर्कात आला होता. तिने त्याला मोहजालात अडकवून त्याच्याकडून गोपनीय माहिती जाणून घेतली होती. या प्रकरणात डाॅ. कुरुलकर सध्या येरवडा कारागृहात आहे. इंडियन मुजाहिदीन या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा पुण्यातील हस्तक मोहसीन चौधरी, रियाज भटकल यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. दोघे जण पाकिस्तानात पसार झाल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
‘आयसिस’साठी काम करत असताना सिरियात भटकल मारला गेल्याचा कयास आहे. पुणे शहर हे संरक्षण दलाच्या दृष्टीने देश पातळीवर महत्त्वाचे शहर आहे. उद्योग, शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातही ते आघाडीवर आहे. नोकरीच्या शोधात अनेक जण परप्रांतांतून येतात. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, ठाणे शहरातून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले होते. बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य हा संवेदनशील विषय आहे. बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाईही सुरू करण्यात आली आहे. त्यांच्यावर तपास यंत्रणा, पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने सजग असणे गरजेचे आहे. संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यानंतर त्याची माहिती त्वरित पोलिसांना देणे गरजेचे आहे.
rahul.khaladkar@expressindia.com