पिंपरी : मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून वाहतूक पोलिसांशी वाद घालत पोलीस चौकीत तोडफोड करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली. ही घटना चाकण वाहतूक विभागातील अंमलदार कक्षात घडली.

गणेश जयवंत कवडे (४६, जेल रोड, नाशिक) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत चाकण वाहतूक विभागातील पोलीस हवालदार दादासाहेब गायकवाड यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कवडे याने मद्य प्राशन करून मोटार भरधाव वेगात चालवून दुसऱ्या वाहनाला धडक दिली. स्‍वतःची चूक असताना त्‍याने समोरील वाहन चालकाकडे नुकसान भरपाईची मागणी करत वाद घातला. त्‍यानंतर तो चाकण वाहतूक विभागाच्या कार्यालयात आला. त्‍याने पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून ब्रेथ अॅनालायझर तपासात अडथळा आणला. त्यानंतर त्याने टेबलवरील दोन मोबाइल फोन, लॅपटॉप आणि सरकारी प्रिंटर फोडून सरकारी संपत्तीचे नुकसान केले. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

मोटारीच्या धडकेत सीआरपीएफ जवानाचा मृत्‍यू

भरधाव वेगातील मोटारीने धडक दिल्‍यामुळे झालेल्‍या अपघातात दुचाकीवरील सीआरपीएफ जवानाचा मृत्‍यू झाला. ही घटना तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ कॅम्‍प येथे घडली. अनमोल विश्वनाथ राय (४१) असे अपघातात मृत्‍यू झालेल्या सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. याप्रकरणी सूरज रोहिदास नवघणे (२८, ब्राम्हणवाडी, मावळ) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. प्रभाकरन एम. (४१, तळेगाव दाभाडे, मावळ) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी नवघणे याने मोटार भरधाव वेगात चालवून रस्ता ओलांडणाऱ्या अनमोल यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात राय गंभीर जखमी होऊन त्‍यातच त्‍यांचा मृत्‍यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अनमोल राय हे तळेगाव सीआरपीएफ कॅम्प येथे कार्यरत होते. ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

भावाच्या पत्नीला पेट्रोल ओतून जाळले

उसने दिलेले पैसे परत मागितल्याचा कारणावरून चुलत भावासोबत भांडण करून भावाच्या पत्नीला पेट्रोल ओतून जाळले. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना भोसरी येथे घडली.

रावसाहेब शिवराम आव्हाड (३०, गणेशनगर, धावडे वस्ती, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष महादेव आव्हाड (वय २७), रंगुबाई संतोष आव्हाड (२५, गणेश नगर, धावडे वस्ती, भोसरी) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रावसाहेब यांनी आरोपी चुलत भाऊ संतोष याला उसने पैसे दिले होते. ते पैसे रावसाहेब यांनी संतोष यांच्याकडे मागितले. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. संतोषची पत्नी रंगुबाई हिने रावसाहेब यांच्या पत्नीला मारहाण केली. त्यानंतर संतोष आणि रंगुबाई या दोघांनी रावसाहेब यांच्या पत्नीवर पेट्रोल ओतून आग लावली. या घटनेत रावसाहेब यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर पिंपरी मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

बोपखेलमध्ये  किरकोळ कारणावरून दोघांवर हल्ला

किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून चार युवकांनी दोघांवर जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना गणेशनगर, बोपखेल परिसरात घडली. याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नेहमीप्रमाणे कामावर जात होते. दुर्गामाता मंदिराजवळ रस्त्यात एक दुचाकी उभा केली होती. तिथे आरोपी तरुण थांबले होते. त्यामुळे फिर्यादीने हॉर्न वाजवून रस्त्यातून दुचाकी बाजूला करण्यास सांगितले. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या पुतण्यास लोखंडी गज आणि काठीने मारून गंभीर जखमी केले. दिघी पोलीस तपास करत आहेत.