पुणे : राज्यात पावसाचा जोर कायम असून, विदर्भ आणि मराठवाडय़ातील काही जिल्ह्यांत पूरस्थिती आहे.  कोकण, मध्य महाराष्ट्र सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत असून, या विभागांत आणखी दोन दिवस मुसळधारांची शक्यता आहे. पुणे, पालघर, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये गुरुवारी काही भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आह़े 

 गेल्या काही दिवसांपासून पूरस्थितीला सामोरे जाणाऱ्या विदर्भातील काही जिल्ह्यांत मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला.  गोंदिया जिल्ह्यात बुधवारी वेगवेगळय़ा ठिकाणी पुरामध्ये पाच जण वाहून गेले. त्यातील एकाला वाचवण्यात यश आले असून, चार जण बेपत्ता आहेत. वर्धा जिल्ह्यातही दोन जण वाहून गेले आहेत. विदर्भातील पूरबळींची संख्या आता ३४ वर पोहोचली आहे.

कोकणात रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कमी असला तरी रायगडमध्ये मुसळधार पाऊस झाला़  रायगडमध्ये बुधवारी सकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने कुंडलिका, अंबा, पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे रोहा, नागोठणे, आणि आपटा परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाण जनजीवन विस्कळीत झाल़े

  मराठवाडय़ातील चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरू असून, एकूण १२६ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ७९ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नदीनाल्यांना पूर आले. अनेक गावांचा संपर्क तुटला असून अर्धापूर आणि भोकर तालुक्यात प्रत्येकी एक जण पुरात वाहून गेला़ अंकुश हरिश्चंद्र सावंत व चरण रामचंद्र राठोड (वय ४५) अशी मृत व्यक्तींची नावे आहे. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असून हिंगोली जिल्ह्यात १९ महसूल मंडळात पाऊस झाला आहे.

घाटमाथ्यांवर काही भागांत अतिवृष्टी होत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रांतही जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ झाली आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कायम असल्याने बुधवारी सायंकाळी ५ पासून कोयनेच्या पायथा वीजगृहातून एक हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पश्चिम घाटात कोसळणारा धो-धो पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे कृष्णा-कोयना नद्यांकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला़

बुधवारी सकाळपासून संध्याकाळी साडेपाचपर्यंत पुणे, मुंबई, सांताक्रुझ आदी भागांत ५० मिलिमीटरच्या आसपास पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरला सर्वाधिक १५२, तर डहाणू येथे ११४ मिलिमीटर पाऊस झाला. नाशिक, सातारा, सोलापूर, अलिबाग, रत्नागिरी, औरंगाबाद, परभणी, नांदेड, अकोला, बुलढाणा, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा आदी जिल्ह्यांतही पावसाची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत माथेरान येथे २१०, लोणावळा येथे १८०, महाबळेश्वर येथे १४०, भामरागड येथे १६०, ताम्हिणीत २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पाऊसमान..

  • पुणे, पालघर आणि नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये काही भागांत गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
  • मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांत पुढील दोन दिवस मुसळधारांचा अंदाज आहे.
  • औरंगाबाद, बीड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा आदी जिल्ह्यांतही मुसळदारांची शक्यता आहे.

आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष – मुख्यमंत्री

राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत आह़े  मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना राज्यातील परिस्थितीबाबत संबंधित यंत्रणेशी समन्वय ठेवण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.