पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी, तसेच भारतीय प्रशासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नवी मुंबईतून एका ट्रक चालकाचे अपहरण करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यातील पोलिसांचे पथक तपासासाठी खेडकर यांच्या बाणेरमधील बंगल्यात पोहोचले. त्या वेळी मनोरमा खेडकर यांनी पोलिसांशी हुज्जत घातली.

याबाबत नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक दीपक खरात यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मनोरमा दिलीप खेडकर (वय ४८, रा. नॅशनल हाऊसिंग सोसायटी, बाणेर)यांच्यासह साथीदारांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २२१, २३८, २५३अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत एका शनिवारी सायंकाळी ट्रक मोटारीला घासून गेल्याने वाद झाला. मोटार चालकाने ट्रक चालकाला धमकावून त्याला मोटारीत घालून अपहरण केले, अशी फिर्याद नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांचे पथक रविवारी (१४ सप्टेंबर) खेडकर यांच्या बंगल्यात दुपारी दीडच्या सुमारास पाेहोचले. खेडकर यांच्या बंगल्यात चौकशीसाठी गेले. मनोरमा खेडकर यांनी बंगल्याचा दरवाजा उघडला.

सहायक पोलीस निरीक्षक दीपक खरात यांनी त्यांना गुन्ह्याची माहिती दिली. खेडकर यांना तपासात मदत करण्यास सांगितले. तेव्हा खेडकर यांनी बंगल्याचा दरवाजा बंद करून घेतला, असे सहायक पोलीस निरीक्षक खरात यांनी फिर्यादीत म्हटले आहे.


या घटनेची माहिती चतु:शृंगी पोलिसांना दिली. चतु:शृंगी घटनास्थळी पोहोचेपर्यंत खेडकर यांनी ट्रक चालकाचे अपहरण करणारा मोटार चालक आरोपी याला पसार होण्यास मदत केली. आरोपी मोटार घेऊन पसार झाला. पोलिसांनी चौकशीत सहकार्य केले नाही, तसेच बंगल्यात त्यांनी पाळीव श्वान सोडून पोलिसांना चौकशीसाठी अटकाव केला, असे खरात यांनी म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अपहरण करण्यात आलेल्या ट्रक चालकाची नवी मुंबई पोलिसांनी सुटका केली. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दाखल गु्ह्याचा तापस सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करत आहेत.

पूजा खेडकर यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत बनावट कागदपत्रे सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात त्यांची चौकशी झाली हाेती. त्यानंतर बनावट कागदपत्रे सादर करुन फसवणूक केल्याच्या आरोपावरुन त्यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी मुळशी तालुक्यातील एका शेतकऱ्याला जमिनीच्या वादातून पिस्तुलाचा धाक दाखविल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली होती. त्यानंतर पौड पोलीस ठाण्यात मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.