पुणे : लोकसभा निवडणूक होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला. त्यानंतर प्रत्येक पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठका आणि दौरे सुरू केले आहेत. तर विद्यमान आणि इच्छुक नेत्यांनी देखील आपापल्या विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे. या सर्व घडामोडी दरम्यान, पुणे शहरातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना उमेदवारी मिळावी यासाठी येरवडा भागात मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावण्यात आले आहेत. “उच्चशिक्षित निर्भीड कणखर व्यक्तिमत्व वडगावशेरी मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी एकच उत्तम पर्याय” असे मजकूर असलेले फ्लेक्स अनेक भागात लावण्यात आले आहेत.

या फ्लेक्समुळे वडगावशेरी मतदारसंघात आगामी काळात सुषमा अंधारे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तसेच, सुषमा अंधारे याच मतदारसंघातील धानोरी भागात वास्तव्यास आहेत. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी हडपसर, वडगावशेरी आणि कोथरूड हे मतदारसंघ ठाकरे गटाला महाविकास आघाडीच्या जागावाटपावेळी मिळावेत अशा अपेक्षा अनेक शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. त्यामुळे पुण्यातून महाविकास आघाडीमार्फत महिलांना संधी दिली जाईल का हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा…पिंपरी- चिंचवड: सांगवीत पोलिसांनी जप्त केली पिस्तुल, जिवंत काडतुसे; शस्रे कोणाला विकली जात आहेत ? तपास सुरु…

या फ्लेक्ससंबंधी ठाकरे गटाचे पुणे शहर उपप्रमुख आनंद गोयल म्हणाले की, पुणे शहर आणि जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठ्या प्रमाणावर ताकद आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने पुणे शहरातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना निवडणूक लढवण्याची संधी द्यावी, अशी मागणी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. मागील दीड वर्षाच्या कालावधीत सुषमा अंधारे यांनी ससून रुग्णालय ड्रग्स प्रकरण ते कल्याणीनगर अपघात घटनेला वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने सुषमा अंधारे यांना उमेदवारी द्यावी अशी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी आहे. या निवडणुकीत सुषमा अंधारे प्रचंड मतांनी निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.