शिरूर : ‘बिबट्यांचा बंदोबस्त केला नाही, तर गावात जशी कुत्री भटकतात, तसे बिबटे भटकतील,’ अशी चिंता व्यक्त करून वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याकरिता सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपायांची माहिती देताना आफ्रिकेतही बिबटे पाठविणार असल्याचे बुधवारी सांगितले.

पिंपरखेड येथील बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या बोंबे (वय ५), रोहन बोंबे (वय १३) या मुलांचा, तसेच जांबूत येथील भागूबाई रंगनाथ जाधव या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. शिरूर तालुक्यात आतापर्यंत बाराहून अधिक नागरिकांना बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी पिंपरखेड गावाला भेट देऊन बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

नाईक म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यात बिबटे पकडण्यासाठी १२०० पिंजरे देण्यात येणार आहेत. त्यातील २०० पिंजरे देण्यात आले आहेत. बिबट निवारण केंद्रातील बिबटे घेऊन जाण्यास गुजरातमधील ‘वनतारा’च्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. नसबंदी हाही एक उपाय अमलात आणण्यात येणार आहे. आफ्रिकेत सिंह आहेत, इतर काही प्राणी आहेत. मात्र, तिथे बिबटे नाहीत. तेथेही बिबटे पाठविण्य़ात येणार आहेत.’ माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशा बुचके, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी अध्यक्ष देवदत्त निकम आदी या वेळी उपस्थित होते.

नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालण्याचे आदेश

‘सध्या बिबट निवारा केंद्रात २० बिबटे असून, अन्य राज्यांमध्येही काही बिबटे पाठविण्यात येणार आहेत,’ असे नमूद करून वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, ‘बिबटे आता माळशेज घाट उतरून कोकणातही उतरले आहेत. बिबट्यांचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर मोकाट श्वानांप्रमाणे ते रस्त्यांवर भटकतील. बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटनांबाबत राज्य शासन गंभीर असून, नरभक्षक बिबट्यांना दिसताक्षणी गोळी घालण्याची सूचना वन विभागाला करण्यात आली आहे.’

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यमुखी पडलेल्या बोंबे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला वन खात्यामध्ये नोकरी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही बिबट्याचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली आहे. – गणेश नाईक, वनमंत्री

बिबट्यांवर नियंत्रणासाठी…

  • पुणे जिल्ह्यात बिबटे पकडण्यासाठी १२०० पिंजरे
  • ‘वनतारा’सह अन्य राज्यांत पाठविणार
  • नसबंदी करून संख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न
  • आफ्रिकेत काही बिबटे पाठविले जाणार