पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागासह मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरातील उत्तरेकडे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तर, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. विशेषत: मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये, घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नद्या, ओढे भरून वाहत आहेत. परिणामी, धाराशिवसह काही जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या दोन दिवसांत (२५ सप्टेंबर) पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. मात्र, त्यानंतर पावसाचे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मोसमी वाऱ्यांसाठी पूरक स्थिती निर्माण होते. त्यामुळे राज्यात पाऊस पडतो. त्यानुसार बंगालच्या उपसागरात येत्या दोन दिवसांत तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा दक्षिण भाग, कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.