पुणे : शहरातील एका नामांकित खासगी विद्यापीठाची अडीच कोटी रुपयांची ऑनलाइन फसवूणक करणाऱ्या उच्चशिक्षित चोरट्याला पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली. आरोपी तरुणाने पीएचडी प्राप्त केली असून, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. ऑनलाइन जुगाराच्या नादामुळे त्याने सायबर फसवणुकीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले.

सितैया किलारू (वय ३४, रा. हैदराबाद) असे अटक करण्यात आलेल्या सायबर चोरट्याचे नाव आहे. सितैया याने लंडनध्ये शिक्षण घेतले आहे. शहरातील एका नामांकित खासगी विद्यापीठातील शैक्षणिक अधिकाऱ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंच्या नावे जुलै महिन्यात संदेश पाठविण्यात आला. त्यात मुंबईतील आयआयटीतील एका प्राध्यापकाचा क्रमांक देण्यात आला होता.

‘शासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ड्रोन संशोधन प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात येणार आहे. निधी मंजुरीसाठी सुरुवातीला दोन टक्के रक्कम भरावी लागेल,’ अशी बतावणी सितैयाने बनावट संदेशात केली होती.

संबंधित नामांकित विद्यापीठातील अधिकाऱ्याने दोन कोटी ४६ लाख रुपये आरोपी सितैया याच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा केले. निधी मंजूर करारासाठी त्याला बोलाविण्यात आले. मात्र, तो तेथे गेला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

विद्यापीठाकडून घेतलेली रक्कम आरोपी सितैयाने स्वत:च्या खात्यात जमा करून घेतली होती. तांत्रिक तपासात ही बाब उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे आणि पथकाने तपास करून त्याला पकडले.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संगीता देवकाते, पोलीस कर्मचारी संदीप मुंढे, बाळासाहेब चव्हाण, नवनाथ कोंडे, संदीप कारकूड, टिना कांबळे, अमोल कदम, सचिन शिंदे, सुप्रिया होळकर आदींनी ही कामगिरी केली.

ऑनलाइन बेटिंगचा नाद

आरोपी सितैया मूळचा विजयवाडा येथील आहे. २०१० मध्ये त्याने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. २०१० ते २०१४ या कालावधीत त्याने लंडनमधील एका नामांकित विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केले. नंतर त्याने पीएचडी मिळविली. २०१५ मध्ये हैदराबादमधील एका विद्यापीठात त्याने नोकरी केली. २०१९ आणि २०२० मध्ये सितैया केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अनुक्रमे पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला.

काही काळ त्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. कौटुंबिक वादामुळे त्याने नोकरी सोडली. त्यानंतर त्याला ऑनलाइन सट्टेबाजीचा नाद लागला. सट्टेबाजीमुळे त्याच्यावर कर्ज झाले. कर्जबाजारी झाल्याने त्याने गुन्हे करण्यास सुरुवात केली. सितैयाविरुद्ध यापूर्वीही ऑनलाइन फसवणुकीचे आठ गुन्हे दाखल आहेत.

दीट कोटी रुपये उडविले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील खासगी विद्यापीठाची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्यानंतर सितैयाने सासऱ्याने घेतलेले कर्ज फेडले. घरमालकाला वर्षभराचे आगाऊ भाडे दिले. दोन मोटारी खरेदी केल्या. दीड कोटी रुपये त्याने ऑनलाइन जुगारात उडविले.

पोलिसांनी त्याच्या दोन खात्यांतील २८ लाख रुपये गोठविले आहेत. त्याच्याकडून दहा डेबिट कार्ड, १२ बँक खाते पुस्तिका, सोने खरेदीच्या पावत्या, लॅपटाॅप, टॅब, दोन मोटारी असा ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयाने २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.