पिंपरी- चिंचवड: आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये वाहतूक कोंडीसह इतर समस्यांमुळे ग्रासलेल्या संगणक अभियंत्यांनी हिंजवडी ग्रामपंचायत पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत विलीन करण्यात यावी, या मागणीसाठी ऑनलाइन सह्यांची मोहीम राबवली आहे. आत्तापर्यंत २२ हजार संगणक अभियंत्यांनी सह्या केल्या आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात संगणक अभियंते एकत्र आले होते. यावेळी त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. जगाचा नकाशावर हिंजवडीचं नाव झळकत आहे. आयटी हब म्हणून गाजावाजा केला जातो. परंतु, आम्हाला महत्वाच्या सोयी- सुविधा दिल्या जात नाहीत. अशी त्यांची ओरड आहे.

अगदी काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे हिंजवडीमध्ये मुख्य रस्त्यांना नद्यांच स्वरूप आलं होतं. या पाण्यातून संगणक अभियंत्यांना वाट काढावी लागली. अशीच आमची अवस्था राहिली तर या ठिकाणच्या कंपन्या परदेशात निघून जातील अशी भीती व्यक्त केली आहे. गेले कित्येक वर्षांपासून हिंजवडीमध्ये वाहतूक कोंडी आहे. फुटपाथ चा विषय मार्गी लागत नाही. रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा होत नाही. अशा अनेक समस्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडवतील अशी अपेक्षा संगणक अभियंत्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्वतः हिंजवडीमध्ये येऊन या ठिकाणची पाहणी करावी अशी मागणी देखील संगणक अभियंत्यांनी केली आहे. केवळ आम्ही टॅक्स भरायचा आणि सुख सुविधेपासून वंचित राहायचं का? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. यावेळी काही स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते. ते हिंजवडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य आहेत. हिंजवडी ग्रामपंचायत पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत विलीन करण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे.

हिंजवडीची लोकसंख्या खूप मोठी असल्याने या ठिकाणचा विकास ग्रामपंचायत करू शकत नाही. हिंजवडी ग्रामपंचायत पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत विलीन करण्यात यावी अशी मागणी यावेळी स्थानिक नागरिकांनी केली आहे. सांगणं अभियंत्यांना त्यांनी पाठिंबा असल्याचे म्हटल आहे. हिंजवडीचा पायाभूत विकास करायचा असल्यास केवळ पिंपरी- चिंचवड महानगरपालिका हाच पर्याय असल्याचं त्यांनी म्हटल आहे. या सगळ्या मागण्या होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय? निर्णय घेतात. हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. लवकरच संगणक अभियंते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत.