पिंपरी- चिंचवड: लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे. तरीही अनेक हौशी कार्यकर्ते फ्लेक्सबाजी करत आपल्या नेत्याला खासदार नसताना ही शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत. पिंपरी- चिंचवड शहरातील खंडोबा माळ चौकात थेट उदयनराजे भोसले यांचे फ्लेक्स झळकले आहेत. निकाल लागण्याधीच उदयनराजे यांना खासदारकीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. याआधी शहरात अमोल कोल्हे, संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणे यांचे फ्लेक्स झळकले होते. त्या पाठोपाठ आता उदयनराजेंचे फ्लेक्स झळकत आहेत.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवडमध्ये एकाची गोळ्या झाडून हत्या; अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार

पिंपरी- चिंचवड शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून आकुर्डी खंडोमाळ चौकाची ओळख आहे. याच चौकात भला मोठा फ्लेक्स लावण्यात आला आहे. “श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले हे खासदार पदी निवडून आल्याबद्दल शुभेच्छा”, अशा आशयाचे हे फलक लावण्यात आले आहेत. यामुळे निकलाधीच राजेंच्या या फ्लेक्सची शहरात जोरदार चर्चा आहे. अनेक हौशी कार्यकर्ते असे फलक लावत असले तरी चार जूनला अधिकृत निकाल लागणार आहे. तेव्हाच, कळेल की नक्की कोण खासदार होणार. मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील असेच फ्लेक्स झळकले आहेत. संजोग वाघेरे, श्रीरंग बारणे, शिवाजी आढळराव पाटील, अमोल कोल्हे यांच्या नावाने आणि खासदार असा उल्लेख असलेले फ्लेक्स झळकले होते. आता राजेंच्या फ्लेक्समुळे पुन्हा एकदा शहरात चर्चा रंगली आहे.