पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीत भाजपचे माजी उपमहापौर, स्थायी समितीचे तीन माजी अध्यक्ष, माजी विरोधी पक्षनेत्यांसह दिग्गज माजी नगरसेवकांना धक्का बसला आहे. त्यामुळे अनेकांना कुटुंबातील महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे. आरक्षणामुळे झालेल्या बदलामुळे अनेक प्रभागांमध्ये राजकीय पक्षांना नव्याने मांडणी करावी लागणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मंगळवारी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली सोडत प्रक्रिया पार पडली. ए-फोर साईजच्या कोऱ्या कागदावरुन आरक्षणाच्या चिठ्ठ्या तयार करण्यात आल्या. एका रंगाच्या रबरने त्या गुंडाळल्या, पारदर्शक गोल डब्यामध्ये टाकून फिरविल्यानंतर शाळेतील मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्या काढण्यात आल्या.
प्रभाग क्रमांक दहा शाहूनगर, संभाजीनगरमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलेचे आरक्षण पडल्याने भाजपचे माजी उपमहापाैर केशव घाेळवे, प्रभाग क्रमांक एक चिखली, प्रभाग क्रमांक २४ गणेशनगरमध्ये अनुसूचित जातीचे (एससी) आरक्षण न पडल्याने माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक सचिन भाेसले यांची संधी गेली आहे. महिलेसाठी प्रभाग राखीव झाल्याने विकास डोळस, सागर अंगाेळकर, अंबरनाथ कांबळे, संताेष कांबळे, शैलेश माेरे, माजी विरोधी पक्षनेते श्याम लांडे, सागर गवळी यांची अडचण झाली आहे. त्यांना कुटुंबातील महिलेला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे.
स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, ममता गायकवाड, सुलक्षणा धर, अश्विनी वाघमारे, कमल घाेलप, आश्विनी बाेबडे, गिता मंचरकर, आशा शेंडगे, शारदा सोनवणे, माधवी राजापुरे यांना पुरुष उमेदवारांविरोधात लढावे लागणार आहे.
इंद्रायणीनगर प्रभागात एकच सर्वसाधारण जागा असल्याने स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांना अनेक दिग्गजांसमोर लढावे लागेल. सर्वसाधारण आरक्षण पडल्याने नागरिकांचा मागास प्रवर्गातील संगिता ताम्हाणे, महिला आरक्षण पडल्याने अभिषेक बारणे, माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले यांची अडचण झाली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलेचे आरक्षण पडल्याने उत्तम केंदळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांना सर्वसाधारण प्रवर्गातून लढावे लागणार आहे. राहुल कलाटे, मयुर कलाटे या दोन बंधूंना एकमेकांच्याविरोधात लढायचे नसल्यास एकाच्या कुटुंबातील महिलेला निवडणूक लढवावी लागेल.
धावडेवस्तीमधील ‘एसटी’चे आरक्षण दापाेडीत
भाेसरी विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक सहा धावडे वस्ती मधील अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण पिंपरी विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक ३० दापाेडीत पडले आहे. त्यामुळे धावडेवस्तीमधून गतवेळी भाजपकडून निवडून आलेल्या यशाेदा बाेईनवाड यांची संधी हुकणार आहे.
