वसंत मोरे यांची नाराजी आता तरी दूर होणार का? पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंकडून वसंत मोरेंना भेटीचे निमंत्रण | In pune Amit Thackeray called vasant more for meeting | Loksatta

वसंत मोरे यांची नाराजी आता तरी दूर होणार का? पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंकडून वसंत मोरेंना भेटीचे निमंत्रण

अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शुक्रवारी दुपारी वसंत मोरेंना भेटीसाठी बोलवलं आहे.

वसंत मोरे यांची नाराजी आता तरी दूर होणार का? पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंकडून वसंत मोरेंना भेटीचे निमंत्रण
वसंत मोरे यांची नाराजी आता तरी दूर होणार का? पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंकडून वसंत मोरेंना भेटीचे निमंत्रण ( Image _ लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुण्यातील कट्टर समर्थक, माजी शहर अध्यक्ष, नगरसेवक वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. पुणे मनसे शहर अध्यक्ष बाबू वागसकर हे शहरातील कार्यक्रमापासून दूर ठेवत असल्याची नाराजी वसंत मोरे यांनी अनेक वेळा उघडउघड बोलून दाखवली आहे. आता मोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी मनविसेचे प्रमुख अमित ठाकरे मध्यस्थी करणार असल्याची शक्यता आहे. अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शुक्रवारी दुपारी वसंत मोरेंना भेटीसाठी बोलवलं आहे. त्यामुळे या भेटीनंतर मोरेंची नाराजी दूर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी स्वतः राज ठाकरे यांनी मोरे यांच्याशी चर्चा केली होती, मात्र त्यानंतरही पुण्यात मनसेमधील धुसफूस कायम असल्याचं चित्र बघायला मिळालं आहे.

हेही वाचा… पुणे: रिक्षा चालकांना आंदोलन न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

गेल्या महिन्यात पुण्यात आयोजित केलेल्या मनसेच्या एका कार्यक्रमात बोलू न दिल्यामुळे मोरे नाराज असल्याचे म्हटले जात होते. या नाराजीवर बोलताना मला या कार्यक्रमात बोलू द्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया देखील मोरे यांनी तेव्हा दिली होती. वसंत मोरे यांच्याबाबत येत्या दोन दिवसात सविस्तर खुलासा केला जाईल, अशी भूमिका वागसकर यांनी मांडली होती. पण अद्याप बाबू वागसकर यांनी कोणत्याही प्रकारचा खुलासा केला नसल्याने वसंत मोरे नाराजी नाट्य कायम असल्याचं स्पष्ट झालं होतं.

हेही वाचा… दोन लाख ८१ हजार मतदारांची नावे वगळली; पुणे जिल्ह्यातील २१ मतदार संघांतील मतदारांची संख्या ७८ लाख ७६ हजार

दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर दिली होती. त्यामुळे मोरे आता मनसेला रामराम ठोकून राष्ट्रवादीची वाट धरणार की काय अशी चर्चा सुरु होती. मात्र, मोरेंनी आपण मनसे सोडणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 13:45 IST
Next Story
पुणे: रिक्षा चालकांना आंदोलन न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन