पुणे : पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या मार्गाचे उद्घाटन ६ मार्चला होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे या मार्गावरील मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली. रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्याने त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ फेब्रुवारीला करण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात मोदींचा दौरा लांबणीवर पडल्याने ते होऊ शकले नाही. यामुळे या मार्गाचे उद्घाटन करण्यासाठी अनेक राजकीय पक्षांकडून आंदोलन करण्यात आले होते. आता या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी ६ मार्चचा मुहूर्त काढण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या मार्गावरील मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : पुणे : ‘जीएसटी’ अधिकारी असल्याच्या बतावणीने व्यापाऱ्याची लूट

रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाची अंतिम तपासणी केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग यांनी १९ ते २१ जानेवारी या कालावधीत केली होती. या तपासणीदरम्यान त्यांनी या मार्गातील काही त्रुटी उपस्थित केल्या होत्या. त्या दूर करून महामेट्रोने त्याचा अहवाल आयुक्तांना पाठविल्यानंतर या मार्गाला काही अटींसह परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सेवा सुरू करण्याचा मार्ग खुला झाला आहे. मेट्रोची विस्तारित सेवा गेल्या वर्षी १ ऑगस्टला सुरू झाली. वनाज ते रुबी हॉल हा ९.७ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला. आधी या मार्गावर वनाज ते गरवारे स्थानकापर्यंत सेवा सुरू होती. नंतर गरवारे ते रुबी हॉल स्थानकापर्यंत सेवेचा विस्तार झाला. याच वेळी पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हा १३.९ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला. आधी पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी हा मार्ग होता. नंतर हा मार्ग फुगेवाडीपासून जिल्हा न्यायालयापर्यंत विस्तारला. आता वनाज ते रुबी हॉल मार्ग रामवाडीपर्यंत विस्तारण्यात आला असून, या मार्गावर अद्याप सेवा सुरू झालेली नाही.

हेही वाचा : मावळ लोकसभेवर ‘वंचित’चा दावा; महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

येरवडा स्थानक वगळणार

रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही स्थानके आहेत. हा मार्ग ५.५ किलोमीटरचा आहे. या मार्गावरील येरवडा स्थानकाच्या प्रवेशद्वाराचा एक जीना नगर रस्त्यात येत असल्याने महापालिकेने तो दुसरीकडे हलविण्यास सांगितले होते. त्यानुसार महामेट्रोकडून जीना दुसरीकडे करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील सेवेतून येरवडा स्थानक सध्या वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिनाभरानंतर हे स्थानक सुरू केले जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

मेट्रोची विस्तारित सेवा

वनाझ ते रामवाडी – १६ किलोमीटर

पिंपरी चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय – १३ किलोमीटर