पुणे : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कार्यालयातील अधिकारी असल्याच्या बतावणीने व्यापाऱ्याला लुटण्यात आल्याची घटना मार्केट यार्डमधील भुसार बाजारात घडली. याबाबत एका व्यापाऱ्याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केट यार्डमधील भुसार बाजारात व्यापारी पेढीत सहाजण शिरले. जीएसटी कार्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी चोरट्यांनी केली.
हेही वाचा : पुणे : शाळकरी मुलावर कोयत्याने वार; अल्पवयीन मुलांसह साथीदारांवर गुन्हा
पेढीतील व्यवहारांची तपासणी करायची असल्याची बतावणी करून चोरट्यांनी मोबाइलवर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. व्यापाऱ्याला धमकावून गल्ल्यातील २० हजारांची रोकड लुटून चोरटे पसार झाले. तपासणीच्या नावाखाली व्यापाऱ्याला तोतया जीएसटी अधिकाऱ्यांनी लुटल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मार्केट यार्डातील भुसार बाजारात घबराट उडाली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.