पुणे : ‘मुंबई, पुणे यांसारख्या शहरातच मराठी भाषेची सर्वाधिक गळचेपी होत आहे. सर्व स्तरांतील बहुतांश विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत आहेत. महापालिकेच्या नव्वद टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांची मुले मराठी शाळेत शिकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. महापालिकेच्या शाळा बंद पडत असून, खासगी शाळांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे,’ अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
पुणे महापालिकेचे सांस्कृतिक केंद्र आणि शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘जागर अभिजात मराठीचा’ या कार्यक्रमात देशमुख बोलत होते. ‘उड्डाणपूल बांधा वा बांधू नका, रस्त्यांवरच्या खड्ड्यांपेक्षा शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. आमच्या मुलांना चांगले शिक्षण द्या. त्यासाठी आम्ही कर भरतो. तुम्ही जर चांगले शिक्षण दिले नाहीत, तर समाज तुम्हाला माफ करणार नाही,’ असे खडे बोल त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुनावले.
ज्येष्ठ बालसाहित्यकार राजीव तांबे, ल. म. कडू, डॉ. संगीता बर्वे यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त किशोरी शिंदे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख राजेश कामठे, माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, कामगार विभाग आयुक्त नितीन केंजळे, उपायुक्त वसुंधरा बारवे, प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे, आशा उबाळे, संवाद, पुणेचे सुनील महाजन, रत्ना दहिवेलकर आदी या वेळी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ‘महापालिकेची प्रत्येक शाळा ‘मॉडेल स्कूल’ झाली पाहिजे. महापालिकेच्या शाळेत शहरातील बहुतांश गरीब विद्यार्थी शिक्षण घेत असतात. अभिजात मराठी भाषा टिकवायची असेल, तर या मुलांनाही चांगले मराठी लिहिता-वाचता यायला हवे. कला-क्रीडा आणि साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम अशा उपक्रमांमध्ये मुले सहभागी होतात का, हे पाहायला हवे. अविकसित भागांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षकांना प्रेरणा आणि आवश्यक ती सर्व साधने उपलब्ध करून द्यायला हवीत.’
‘विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय जोपासायला हवी. प्रत्येक शाळेत ग्रंथालयाची तपासणी करा. तिथे नवनवीन पुस्तके उपलब्ध करून द्यायला हवीत. शाळेत दैनंदिन प्रार्थनेबरोबर एका पुस्तकाचा परिचय विद्यार्थ्यांना करून द्यायला हवा. त्यांना दर आठवड्याला एक पुस्तक घरी देऊन ते वाचून घेण्यासाठी पाठपुरावा करायला हवा,’ अशा सूचना त्यांनी केल्या.
‘मराठीच्या अभिजाततेसाठी लहान मुलांनी मोठ्यांकडून आणि मोठ्यांनी लहानांकडून शिकणे गरजेचे आहे,’ असे तांबे यांनी सांगितले. ‘आपले अनुभव आपल्या शब्दांत कागदावर उमटविण्याचा प्रयत्न करा,’ असा सल्ला कडू यांनी विद्यार्थ्यांना दिला. डॉ. बर्वे यांनी भाषेचे महत्त्व सांगून ‘माय मराठी’ ही कविता सादर केली. भाषा टिकवण्यासाठी मराठी भाषकांनीही प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘मराठी भाषा जिवंत राहावी आणि तिच्या आदानप्रदानाची परंपरा टिकून राहावी, यासाठी विविध उपक्रम हाती घेतले गेले आहेत,’ असे दिवटे यांनी नमूद केले.
पुणे महापालिका ही श्रीमंत महापालिका आहे. एका उड्डाणपुलाच्या खर्चात महापालिकेच्या सगळ्या शाळांसाठी लागणारा खर्च सहज करता येईल. – लक्ष्मीकांत देशमुख, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष