पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बाणेर, पर्वती भागात सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील, गणेश बिडकर यांच्या सह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आपल्या देशाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. याच दहा वर्षांत चांदणी चौकातील पुल, रस्ते, मेट्रो, इलेक्ट्रिक बस आल्या. तर सर्वाधिक इलक्ट्रिक बसेस पुण्यात आल्या आहेत. यामुळे प्रदूषण कमी झाले असून पुणेकर नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे. हे सर्व नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य झाले आहे. तसेच २०१४ पासून बदललेले पुणे आपल्याला बघायला मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी नवीन प्रकल्प पुण्यात येतील आणि पुण्याचा कायापालट होईल. त्यासाठी तिसर्‍यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी १३ तारखेला मतदानावेळी मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे,असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा : पुण्यातील वाहतूक सुरळीत करण्याचा ‘संकल्प’ सोडणारे स्वतः कोंडीत अडकतात तेव्हा…

तसेच ते पुढे म्हणाले की, विकासपुरूष नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्या समवेत वेगवेगळ्या १८ पक्षांची महायुती आहे. तर राहुल गांधी यांच्यासमवेत २४ पक्षांची खिचडी आहे. त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. २४ नेते संगीत खुर्चीतून पाच वर्षे एक याप्रमाणे नेता निवडतील. १४० कोटी लोकांचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पर्याय उपलब्ध करू शकले नाहीत. सबका साथ सबका विकास नरेंद्र मोदी करीत आहेत. तर दुसर्‍या बाजूला विरोधकांच्या इंजिनात कुटुंबातील व्यक्तींसाठी जागा आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या इंजिनात सर्वसामान्यांना जागा असल्याचं सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांनी सुनावले.