पिंपरी : महायुती सरकारला आत्मविश्वास राहिला नाही. त्यामुळे यात्रा काढत आहेत. आता सरकारच्या योजना सांगण्यासाठी ५० हजार योजना दूत नेमणार आहेत. साडेतीन महिन्याचा कालावधी दिला असून ३०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार घाबरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. लोकसभेच्या निवडणुकी अगोदर आमच्याकडे कोणी बघत नव्हते, कोणी येत नव्हते. आता एका जागेवर दहा जण इच्छुक असल्याचेही ते म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यात काढण्यात येत असलेली शिवस्वराज्य यात्रा ९ ऑगस्ट रोजी भोसरीत आली. त्यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, निरीक्षक प्रकाश म्हस्के, माजी महापौर आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे, अजित गव्हाणे, विशाल काळभोर, काशिनाथ नखाते यावेळी उपस्थित होते. हेही वाचा : लोणावळा: मद्यधुंद पर्यटक २०० फुट उंच डोंगरावरून पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर उतरला! मित्रांसोबत झाला होता किरकोळ वाद जयंत पाटील म्हणाले, की लोकसभेच्या निवडणुकी अगोदर आमच्याकडे कोणी बघत नव्हते, कोणी येत नव्हते. पण, जनतेच्या मनातील गोष्टी आम्ही मांडत गेलो आणि जनतेने आम्हाला प्रतिसाद दिला. पक्षाने लोकसभेला दहा जागा लढविल्या त्यापैकी आठ निवडून आणल्या आहेत. त्यामुळे आता एका जागेवर लढण्यासाठी दहा-दहा जण इच्छुक आहेत. महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. नऊ अर्थसंकल्प मांडताना लाडक्या बहिणीची आठवण झाली नाही. लोकसभेला जनतेने जागा दाखविल्यानंतर लाडकी बहीण योजना आणली. आता ही योजना चालू ठेवण्यासाठी 'आमचे बटन दाबा' असा दम दिला जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहिण योजना थांबविणार नाही. त्या रकमेत वाढ केली जाईल. महाराष्ट्रातून १७ प्रकल्प बाहेर गेले असून याचे पाप महायुतीचे आहे. महायुतीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्र राज्य मागे पडला आणि गुजरात पुढे गेले. पण, भाजपचे लोक पक्ष फोडण्यात मश्गुल होते. हेही वाचा : पिंपरी- चिंचवड: मेळावा ‘शिवस्वराज्य’ यात्रेचा; चर्चा अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याची भोसरीतील नेत्याचे लंडनमध्ये दोनशे कोटींचे हॉटेल? भोसरीतील प्रत्येक कामात भ्रष्टाचार सुरू आहे. शीतलबागेतील सात लाखाचा पूल सात कोटींवर कसा केला. मोशीत कचराडेपो नसून सोन्याचा डेपो आहे. कचऱ्यातून पैसे कमविले जात आहेत. भोसरीतील कोणत्या व्यक्तीचे दोनशे कोटीचे हॉटेल लंडनमध्ये आहे, असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. लोकसभेला कानाखाली मारली म्हणून लाडक्या खुर्चीसाठी लाडकी बहीण योजना आणल्याचा आरोपही त्यांनी केला.