पुणे : शिरुरचे आमदार, तसेच राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार अशोक पवार यांचा मुलगा ऋषीराज यांचे अपहरण करुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अशोक पवार यांची मुलगी आम्रपाली आणि वकील असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रकरणी शनिवारी रात्री उशीरा शिरुर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऋषीराज पवार शनिवारी दुपारी प्रचारात व्यस्त होते. अशोक पवार यांचा कार्यकर्ता भाऊ कोळपे याने छोटी बैठक घ्यायची असल्याचे सांगितले. कोळपे याच्यावर विश्वास ठेऊन ऋषीराज मांडवगण फराटा परिसरात गेले. तेथे त्यांना कोळपे आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन कार्यकर्त्यांनी एका खोलीत नेले. त्यांनी त्यांचे हातपाय बांधले. तेथे त्यांना विवस्त्र केले. एका महिलेला खोलीत बोलावून अश्लील कृत्य करण्यास सांगितले. मोबाइलवर चित्रीकरण करण्यात आले. त्यांना डांबून ठेवले. असे करण्यासाठी पुण्यातील एकाने दहा कोटी रुपये दिल्याचे कोळपे याने त्यांना सांगितले. त्यानंतर ऋषीराज यांनी कोळपे आणि साथीदारांना जास्त पैसे देण्याचे आमिष दाखविले, असे ॲड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा :“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार”; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, गेल्या दहा वर्षात एक ही…!

शेजारील गावात माझा मित्र राहायला आहे. त्याच्याकडून पैसे मिळवून देण्याची व्यवस्था करतो, असे ऋषीराज यांनी सांगितले. त्यानंतर त्यांना कोळपे आणि साथीदार शेजारच्या गावात घेऊन गेले. त्यांनी कोळपे याला बोलण्यात गुंतविले. मोबाइल संच ताब्यात घेऊन या घटनेची माहिती एका कार्यकर्त्याला दिली. कोळपेला पकडा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी कोळपेला पकडले. त्याच्याकडील मोबाइल संच ताब्यात घेतला.

हेही वाचा :पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

दरम्यान, याप्रकरणी रात्री उशीरा शिरुर पोलिसांनी भाऊ कोळपे, त्याचे दोन साथीदार आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. खंडणी, धमकावणे, अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ऋषीराज अशोक पवार (वय ३० रा. वडगाव रासाई, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गिरे तपास करत आहेत.

माझ्या मुलााच्या बाबतीत घडलेली घटना घृणास्पद आहे. राजकारणाचा स्तर खालावला आहे. असे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करायला हवी.

अशोक पवार, आमदार, शिरुर
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune ncpsp mla ashok pawar son kidnapped for rupees 10 crores threatened to publish obscene video pune print news rbk 25 css