पुणे : शाळेतून घरी निघालेल्या एका १३ वर्षीय मुलाला अडवून त्याच्या ओळखीतील एका अल्पवयीनाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका १७ वर्षीय अल्पवयीन युवकाविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत मुलाच्या आईने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अल्पवयीनाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १३ वर्षीय मुलगा ११ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास शाळेतून घरी निघाला होता. त्यावेळी आरोपी अल्पवयीनाने त्याला अडविले. खेळायला जाऊ अशी बतावणी केली. त्यानंतर मुलाला शाळेच्या परिसरात एका झाडाजवळ नेऊन त्याला पैसे देण्याचे आमिष दाखविले. मुलावर त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलाने त्याला विरोध केल्यानंतर त्याला मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक सानप तपास करत आहेत.
अल्पवयीनांवरील अत्याचाराच्या घटना शहरात वाढीस लागल्या आहेत. अल्पवयीनांवरील अत्याचाराचे १०० पेक्षा अधिक गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गेल्या आठ महिन्यात दाखल झाले आहेत.
अश्लील कृत्य केल्या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा
संगीत शिकवणीला निघालेल्या मुलीला आसनपट्टा (सीटबेल्ट) लावून देण्याच्या बहाण्याने मोटार चालकाने अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघड केला आहे. या प्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी पीडित मुलगी आणि त्यांच्याकडे काम करणारी एक महिला प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारीने (कॅब) संगीत शिकवणीला निघाली होती. त्यावेळी मोटारचालकाने आसनपट्टा लावून देण्याच्या बहाण्याने अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर मोटार चालकाविरुद्ध ‘पोक्सो’अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक माळी तपास करत आहेत.