लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: देशातील हवामानाचा अंदाज अचूकतेने वर्तवण्यासाठी आता पर्जन्यमान, हवामानाच्या नोंदी देशभरात ग्रामपंचायत स्तरावरून घेतल्या जाणार आहेत. ग्रामविकास मंत्रालय, भूविज्ञान मंत्रालय आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे. त्या शिवाय पुणे, औरंगाबाद आणि मुंबई येथे रडार बसवण्यात येणार आहे.

कृषी महाविद्यालयातील वेधशाळेच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीच्या उद्घाटनानंतर भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. महापात्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. हवामान अंदाज, वाढते तापमान, तंत्रज्ञानाचा वापर आदी मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.

हेही वाचा… पिंपरी : साखरपुड्यानंतर तरुणीवर अत्याचार, पाच लाखांची फसवणूक आणि लग्नास नकार

डॉ. रविचंद्रन म्हणाले, की हवामान विभागाकडून राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवर हवामान अंदाज दिले जातात. सध्या देशभरातील सुमारे सात हजार मंडल स्तरावर वेधशाळा आहेत. हवामानाचे अधिक अचूक अंदाज वर्तवण्यासाठी सूक्ष्म नोंदींची गरज आहे. त्यातून हवामानातील बदल नेमकेपणाने कळू शकतात. या नोंदीद्वारे हवामान अंदाजांसाठी प्रारूप विकसित केले जाऊ शकते. त्यामुळे आता ग्रामपंचायत स्तरावर हवामानाच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी ग्रामविकास मंत्रालय, राज्य सरकार यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचा प्रयत्न आहे.

हेही वाचा… “…अन्यथा सरकार लफंग्याला पाठिशी घालतंय हे मान्य करा”; मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून संजय राऊतांचं फडणवीसांवर टीकास्र!

नवउद्यमी पुढे आल्यास हवामान विदाचे विश्लेषण शक्य

हवामान विभागाकडे शंभर वर्षांहून अधिक काळातील हवामानाच्या नोंदीचा विदा आहे. त्यात पर्जन्यमान, तापमान, पृष्ठभागाचे तापमान आदींचा समावेश आहे. विदा विश्लेषण आणि त्याच्या साधनांचा वापर करून या विदा नोंदीचा उपयोग हवामान अंदाज आणि मार्गदर्शनासाठी करता येऊ शकतो. त्यासाठी नवउद्यमींना पुढे येऊन या विदाचा वापर करणे शक्य आहे, असे डॉ. महापात्रा यांनी सांगितले.

‘उष्णतेचे शहरी बेट’ या घटकाचा व्यापक अभ्यास आवश्यक

गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने तापमानवाढ होत आहे. त्याचा संबंध जागतिक तापमानवाढीशी आहे. मात्र उष्णतेचे शहरी बेट (अर्बन हीट आयलंड) तयार होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे काही शहरांतील ठरावीक भागांतील तापमान का जास्त असते, त्यामागे कोणती कारणे आहेत याचा व्यापक अभ्यास होण्याची गरज आहे. त्या दृष्टीनेही प्रयत्न असल्याचे डॉ. रविचंद्रन यांनी नमूद केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune weather records now from gram panchayat level informed by dr m ravichandran secretary of the ministry of geology pune print news ccp 14 dvr