पुणे : राज्यात शुक्रवारअखेर (२१ जून) ३५५ तालुक्यांपैकी ७८ तालुक्यांत अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात राज्यात सरासरी २०८ मिमी पाऊस पडतो. यंदा शुक्रवारअखेर ६८ टक्के म्हणजे १४१ मिमी पाऊस पडला आहे, तर सरासरीच्या २४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जून महिन्यात सरासरी २०८ मिमी पाऊस पडतो. यंदा शुक्रवारअखेर (२१ जून) ६८ टक्के म्हणजे १४१ मिमी पाऊस पडला आहे. राज्यातील एकूण ३५५ तालुक्यांपैकी १७ तालुक्यांत २५ टक्क्यांपेक्षा कमी, ६१ तालुक्यांत २५ ते ५० टक्के, ६८ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के, ५३ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के आणि १५६ तालुक्यांत १०० टक्क्यांहून जास्त पाऊस पडला आहे.

हेही वाचा: Porsche Car Accident : पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या वडीलांना जामीन मंजूर, पण तरीही कोठडीतच राहावं लागणार

जून महिन्यातील असमान पाऊस वितरणाचा पेरण्यांवर विपरीत परिणाम झाला आहे. मागील पाच वर्षांचे राज्यातील सरासरी पेरणी क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. यंदा शुक्रवारअखेर सरासरीच्या तुलनेत २४ टक्के क्षेत्रावर म्हणजे ३३.८३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग पेरणीत आघाडीवर असून, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात सरासरीच्या ५४ टक्क्यांवर पेरणी झाली आहे.

राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

मोसमी पावसाने शुक्रवारी आगेकूच करून संपूर्ण विदर्भ व्यापून पुढे वाटचाल केली. आता जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या काही भागात आणि नंदूरबार जिल्ह्यात मोसमी पाऊस दाखल होणे बाकी आहे. पुढील दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व्यापून मोसमी पाऊस गुजरातमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. राज्यात पुढील चार दिवस सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याला नारंगी इशारा दिला असून, राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना पिवळा इशारा दिला आहे.

हेही वाचा: राज्यात ‘डीएपी’ खताचा तुटवडा, जगभरातून आयात घटली

मोसमी पावसाचा जोर वाढला आहे. ४ जुलैपर्यंत मोसमी पाऊस देशाच्या बहुतेक भागात दाखल होईल. राज्यासह देशभरात ४ जुलैपर्यंत चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

डॉ. एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, हवामान विभाग