पुणे : पुण्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शहरातील रस्त्यांची खराब अवस्था आणि पाणी तुंबणे यामुळे वाहतूक कोंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हिंजवडीसह इतर आयटी पार्कच्या परिसरातील कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची जाहीर करावे, अशी मागणी आयटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
फोरम फोर आयटी एम्प्लॉईज या संघटनेने ही मागणी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी म्हटले आहे की, बहुतांश आयटी कंपन्या आधीपासूनच संमिश्र पद्धतीने कामकाज करीत आहेत. त्यामुळे काही दिवस घरून काम दिल्यास कामकाजावर परिणाम होणार नाही. उलट कर्मचारी खड्डेमय रस्ते तुंबलेले पाणी आणि वाहतूक कोंडी यात अडकून पडणार नाहीत.
पुण्यातील सध्याची रस्त्यांची खराब अवस्था पाहता घरून काम करण्याची मुभा देणे आवश्यक बनले आहे. शहर परिसरात अनेक भुयारी मार्गांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. याचबरोबर अनेक रस्त्यावर पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होते. रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून पावसामुळे ते दिसून न आल्याने अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम देण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे फोरमने केली आहे.
‘वर्क फ्रॉम होम’चा निर्णय घेतल्यास
- वाहतुकीवरील ताण कमी होईल
- प्रशासनावरील ताणही कमी होईल.
- कर्मचाऱ्यांची सुरक्षितता जपली जाईल.
मे महिन्यातही मागणी
दरम्यान, मान्सूनपूर्व पावसातच मे महिन्यात आयटी पार्कमधील वाहतूक समस्या बिकट बनली होती. दररोज संध्याकाळी काही किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र होते. त्यामुळे आता या पावसाळ्यात माहिती तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजेच घरून काम करण्याची सक्ती सरकारने करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
प्रकल्प कागदावर
गेल्या काही वर्षांत आयटी पार्कमधील कंपन्यांची आणि पर्यायाने वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. याच वेळी रस्त्यांचे रुंदीकरण आणि पर्यायी मार्ग तयार करण्याकडे दुर्लक्ष झाले. वाहतूक कोंडीच्या समस्येवर वारंवार आरडाओरडा होऊ लागल्याने अखेर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आयटी पार्कमधील उड्डाणपुलासह पर्यायी रस्त्यांच्या ६५० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे नियोजन केले. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून नियोजनापलीकडे या प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम सुरु झालेले नाही.