Ganesh Chaturthi 2025 decoration in Pune : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले. राज्याच्या राजकीय पटलावरील ही घटना चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी पुण्याच्या गणेशोत्सवात चर्चेचा विषय ठरली. शुक्रवार पेठेतील जय बजरंग मित्रमंडळाने साकारलेल्या देखाव्यातून ‘पुलोद’च्या प्रयोगाचा घटनाक्रम सांगण्याचा प्रयत्न केला होता. ही गोष्ट आहे, राज्यातील पहिले आघाडी सरकार आणि त्याची पुणेकरांनी घेतलेल्या दखलीची.

सन १९७९ मध्ये जय बजरंग मित्रमंडळाने ‘शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाची दहीहंडी फोडली’ हा प्रतीकात्मक देखावा साकारला. मंडळाचे तत्कालीन खजिनदार सुरेश जैन सांगतात,‘आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत कोणत्याचा राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नाही. काँग्रेसमध्ये दोन गट झाले होते. मात्र, आघाडीची गरज ओळखून दोन्ही काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली खरी; पण काही दिवसांतच हे सरकार कोसळले.

शरद पवारांच्या नेतृत्वात चाळीस आमदारांनी बंड करत वसंतदादांचे सरकार पाडले होते. त्यावेळी सगळ्यांनाच या गोष्टीचे कुतूहल होते. आता काय होणार, पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? असे प्रश्न सगळ्यांनाच पडत होते. त्यात अचानक बातमी आली, शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार… अडतीस वर्षांच्या शरद पवारांनी ‘पुलोद’चा प्रयोग यशस्वी केला होता. आघाडीचे थर रचत त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची ‘दहीहंडी’च फोडली होती. त्यानंतर लगेच गणेशोत्सवात हाच देखावा साकारण्याचे मंडळाने ठरवले होते.’

‘पूर्वी वाहतुकीच्या सोयीसुविधा नसायच्या. साधनांची कमतरता होती. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये भरपूर उत्साह असायचा. त्याच भरवशावर हा देखावा करायचे ठरवले होते. येरवड्यातील बाबा महाडिक यांनी देखाव्याचा लाकडी ‘सेट’ साकारला. मनुष्यबळ कमी म्हणून कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम केले. येरवड्यातून शहराच्या मध्यवर्ती भागात उत्सवमंडपापर्यंत हा सेट कसा आणायचा, हे आव्हानच होते.

वाहतुकीचा कोणताच पर्याय नव्हता. शेवटी कार्यकर्त्यांनी हातगाडीवरून तो आणला. भरत पळसकर यांच्या बहारदार निवेदनाने देखाव्यात मोठी गंमत आणली. देखावा पाहण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागू लागल्या. सर्व पक्षाचे कार्यकर्ते देखावा पाहायला यायचे. कौतुक करायचे,’ अशी आठवणही जैन यांनी सांगितली.

आतापर्यंत साकारलेल्या अनेक देखाव्यांना नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यात काहीच देखावे कायम स्मरणात राहतात. दीर्घकाळासाठी आठवणींचा भाग होतात. हा देखावा असाच कायमच स्मरणात राहणारा आहे.– सुरेश जैन, जय बजरंग मंडळ