पुणे प्रतिनिधी : पुणे शहरातील मॉडेल कॉलनी येथील जैन समाजाच्या जमीन व्यवहार प्रकरणी भाजपचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव समोर आल्यानंतर, मागील काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी आमदार रवींद्र धंगेकर दररोज नवीन आरोप करत आहेत. तर त्या सर्व घडामोडींदरम्यान काल मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग ठिकाणी भेट दिली आणि “आपण केलेल्या मागणीनुसार निर्णय घेतला जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.

त्यानंतर आज जैन बोर्डिंग या ठिकाणी असंख्य जैन संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर आचार्य गुप्तीनंद महाराज म्हणाले, “एखादी जमीन समाजाला दान केल्यानंतर किंवा एखाद्या समाजासाठी आरक्षित असलेली जमीन ती कोणालाही विकण्याचा अधिकार नाही. पण पुण्यात जैन समाजाची जमीन विकण्याची घटना घडली असून, ट्रस्टींनी चुकीच्या पद्धतीने कारभार केला आहे.

त्यामुळे यापुढील काळात देशभरात कुठेही जैन समाजाच्या जमिनीच्या विक्रीचा व्यवहार होता कामा नये. याबाबत सरकारने कडक पाऊल उचलावे, जैन समाजाच्या बोर्डिंग जमिनीच्या विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात यावा,” या मागणीसाठी उद्या देशभरात मूक मोर्चा काढला जाणार आहे.

२८ तारखेला सुनावणी असल्याने, त्यावेळी पूजा केली जाईल. तसेच २९ तारखेला एक दिवसीय उपवास केला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करावा, अन्यथा १ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले, “काल जैन बोर्डिंगच्या ठिकाणी मुरलीधर मोहोळ आले होते. त्यावेळी आमच्या मंदिरात येऊन, समाजासमोर त्यांनी सांगितले की, ‘मी आपल्या समाजासोबत आहे आणि जमीन व्यवहार प्रकरण १०० टक्के रद्द केले जाईल,’ असा शब्द मोहोळ यांनी देवासमोर दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. पण त्यांनी विश्वास तोडला नाही पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे.”

तसेच ते पुढे म्हणाले, “जैन समाजाच्या जमीन व्यवहार प्रकरण समोर येताच, या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सर्वात प्रथम दखल घेऊन या ठिकाणी भेट द्यायला यायला पाहिजे होते. मात्र ते काही अद्यापपर्यंत आलेले नाहीत, हे अत्यंत खेददायक आहे. तसेच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आवाहन केले होते. पण त्यांनी ॲक्शन घेतल्याने आठ दिवसांचा ‘स्टे’ (स्थगिती) आल्याचे त्यांनी सांगितले.”