मी लवकरच लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करणार आहे. काही लोक येतील भावनिक साद घालतील, ही शेवटची निवडणूक असल्याचे सांगतील, पण तुम्ही मात्र अजित पवार उभा आहे हे समजून मतदान करा. कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील एका कार्यक्रमात भाषण करतेवेळी नाव न घेता शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मला अजित पवारांबरोबर काम केल्याची लाज वाटते. एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं, याचना करणं हे माणूसकीला शोभणारं आहे का ? शरद पवार हे देशाचे नेते तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ज्या कुटुंबाने, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीचे कुंकू कधी पुसलं जाईल,याची आज तुम्ही वाट बघता आहात का? अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती.

हेही वाचा – पोलिसांच्या मोटारीची ज्येष्ठ नागरिकाला धडक; पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा

आता या सर्व घडामोडीदरम्यान अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर म्हणाले की, आम्ही सर्वच शरद पवार यांचा आदरच करतो. पण अजित पवार हे काही चुकीचे बोलले नसून भावनिक आवाहनावर कोणतीही निवडणूक होत नाही. भावनेचा आदर करावा, पण त्याच्या आहारी कोणीही जाऊ नये, असे आवाहन केले. तसेच ते पुढे म्हणाले की, राज्याच्या अनेक भागांत शरद पवार यांनी काम केले आहे. त्यांच्या प्रमाणेच अजित पवारदेखील काम करीत आहेत. त्यामुळे आता शरद पवार यांची अजित पवार यांना आशीर्वाद देण्याची वेळ असून त्यांनी तो आशीर्वाद द्यावा, तसे झाल्यास सध्या जो काही वाद सुरू आहे तो निश्चितपणे थांबले, अशी भूमिकादेखील त्यांनी मांडली.

हेही वाचा – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा जनता दरबार; अधिकाऱ्यांना जागेवरून फोन…

मी पवार साहेबांच्या किती जवळचा आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच जितेंद्र आव्हाड करित आले आहेत. माझे शरद पवार साहेबांवर किती प्रेम आहे. आमचेदेखील प्रेम आहे. पण गरजेपुरत प्रेम नसावे, तसेच राजकीय जीवनात जितेंद्र आव्हाड यांच्या करीता अजितदादांनी खूप काही केले आहे. त्यामुळे तुम्ही (जितेंद्र आव्हाड) काय आहात, हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही काय काय भानगडी केल्या आहेत त्याचा सातबारा देऊ का ? त्यामुळे आपल्या (जितेंद्र आव्हाड) मुंब्रा भागापुरतेच मर्यादित राहावे. बारामती किंवा पुणे जिल्ह्यात लक्ष घालण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांनी (जितेंद्र आव्हाड) यांनी मर्यादित राहावे, अशा शब्दात दीपक मानकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना सुनावले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad should be confined to mumbra area only ncp city president deepak mankar statement svk 88 ssb
First published on: 05-02-2024 at 15:07 IST