पुणे : नवरात्रोत्सवात पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या काही भागांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात प्रामुख्याने या काळात पावसाची शक्यता आहे. विदर्भात २ ऑक्टोबरनंतर पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी (२९ सप्टेंबर) पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत विभागात काही भागांत पावसाची नोंद झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगालच्या उपसागरामध्ये सध्या चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. या भागापासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या काही भागांत सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणखी तीन-चार दिवस पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक भागांतच पाऊस होईल. २ ऑक्टोबरपासून मात्र या भागातही विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. या कालावधीत ईशान्येकडील राज्ये आणि दक्षिणेकडेही पाऊस असणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

पावसाच्या परतीच्या प्रवासाला गती

राजस्थानच्या काही भागातून २० सप्टेंबरला परतीचा प्रवास सुरू केलेला मोसमी पाऊस तब्बल आठ दिवस एकाच ठिकाणी अडखळला होता. या कालावधीत उत्तरेकडील अनेक भागांत मुसळधार पावसाची हजेरी होती. मात्र, गुरुवारी (२९ सप्टेंबर) परतीच्या प्रवासाला गती मिळाली असून, पंजाब, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीतून मोसमी पाऊस माघारी फिरला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Light to moderate rains with lightning likely in some parts of maharashtra pune print news zws
First published on: 29-09-2022 at 20:22 IST