वैभवशाली परंपरा असलेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीतील भव्य रथांची उंची कमी ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी पुलामार्गे (लकडी) पूल विसर्जनासाठी येणाऱ्या मंडळांनी रथांची कमाल उंची १८ फूट तसेच कर्वे रस्त्याने (गरवारे मेट्रो स्थानक) जाणाऱ्या मंडळांनी रथांची उंची १६ फूट ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> शेतीवरील भार कमी करा; पवार यांचे आवाहन

यंदा विसर्जन मिरवणूक ९ सप्टेंबर रोजी आहे. लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणुकीत सहभागी झालेली मंडळे लोकमान्य टिळक चौकातून छत्रपती संभाजी पुलावरून खंडुजीबाबा चौकातून विसर्जन घाटाकडे जातात. कर्वे रस्त्यावरून येणारी मंडळे खंडुजीबाबा चौकमार्गे विसर्जन घाटाकडे जातात.

खंडुजीबाबा चौकात नव्याने निर्माण झालेल्या मेट्रो पुलाची उंची २१ फूट आहे. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरून खंडुजीबाबा चौकाकडे येणाऱ्या मंडळांनी विसर्जन रथाची उंची १८ फुटांपर्यंत ठेवावी. कर्वे रस्त्यावरील गरवारे मेट्रो स्थानकाची उंची १८ फूट आहे. नळस्टॉप कर्वे रस्त्यावरील मेट्रो पुलाची उंची १७ फूट आहे. कर्वे रस्त्यावरून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी विसर्जन रथाची उंची देखाव्यासह १६ फूट ठेवावी. कर्वे रस्त्यावर सेवा रस्त्याची रुंदी १५ फूट असल्याने रथांची कमाल रुंदी १२ फूट ठेवावी, असे आवाहन डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी केले आहे.

हेही वाचा >>> पुणे : सत्ताधाऱ्यांना पवारांची संगत नकोशी?; मेळाव्याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांनी फिरवली पाठ

कर्वे रस्त्यावर फांद्याचा अडथळा

कर्वे रस्त्यावरील आयसीआयसीआय बँकसमाेर असलेल्या पदपथावर झाडांच्या फांद्या सेवा रस्त्यावरून १२ फूट उंचीपर्यंत तिरप्या वाढल्या आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत अडथळा होऊ शकतो, असे पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले.

मंडळांच्या माहितीसाठी ठिकाण उंचीची मर्यादा

छत्रपती संभाजी पूल (लकडी पूल) मेट्रो ओव्हर ब्रीज उंची २१ फूट

गरवारे मेट्रो स्थानक (कर्वे रस्ता) मेट्रो ओव्हर ब्रीज उंची १८ फूट

नळस्टॉप मेट्रो ओव्हर ब्रीज उंची १७ फूट

कर्वे रस्ता सेवा रस्त्यालगतची रुंदी १५ फूट

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Limitation on height of chariots in immersion procession due to metro bridge pune print news amy