पुणे : ‘महाविकास आघाडीत असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढविण्यात येत होती. अशी स्थिती आगामी निवडणुकीमध्येही येऊ शकते. सर्व पक्षांना संघटना वाढविण्याचा अधिकार आहे,’ असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.

अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर, युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस रोहन सुरवसे, स्वाती चिटणीस, मारुती किंडरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. त्या वेळी ते बोलत होते. आमदार शरद मांडेकर, माजी आमदार रमेश थोरात, सुनील टिंगरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, वैशाली नागवडे या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, तरच कार्यकर्ते तयार होतात. मात्र, सुसंस्कृत राजकारण करा, वेडीवाकडी विधाने करू नका.’

‘सर्वांनाच उमेदवारी मिळेल, असे नाही. उमेदवाराची जिंकून येण्याची क्षमता लक्षात घेऊनच तिकीट दिले जाईल. कार्यकर्त्यांना संघटनांमध्येही जबाबदारी घ्यावी लागणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथस्तरावर काही जबाबदाऱ्या दिल्या जातील. त्यामुळे कोणीही वरवरची कामे करू नका,’ असेही पवार म्हणाले.

‘ज्यांच्या सोबत राहायचे आहे. त्यांच्याबरोबर निष्ठेने राहा अन्यथा हाती काहीच लागणार नाही. निष्ठेला आणि ध्येयाला महत्त्व द्या. जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांच्या घरापर्यंत जा. यापुढे राज्यात मला जास्त वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. ती योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

‘आता पांघरूण घालायला शरद पवार नाहीत’‘पूर्वीचे अजित पवार आणि आताचे अजित पवार यात खूप मोठा फरक आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माझ्याकडे यायला संकोच करू नका. वय जसे वाढते तसा माणूस समंजस होतो. यापूर्वी काही चूक झाली, तर पांघरूण घालायला शरद पवार होते. यापुढे आपल्यालाच पांघरूण घ्यायचे आहे,’ असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.