पुणे : Maharashtra Rain Forecast गेल्या २४ तासांत कोकणसह घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली, तर राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाने हजेरी लावली. कोकणवगळता उर्वरित राज्यात ११ सप्टेंबरपासून पावसाचा जोर कमी होणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाला आहे. परिणामी मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या २४ तासांत या चारही राज्यांत जोरदार पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील कोकणात सर्वाधिक दापोली येथे २५० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Mumbai Monsoon Update: दमदार पावसामुळे धरणांत भर

कोकणात शुक्रवारपर्यंत (१५ सप्टेंबर) पावसाचा जोर राहणार आहे; मात्र राज्याच्या उर्वरित भागात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात रविवारी (१० सप्टेंबर) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार आठवडे राज्यभरात कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. १० ते १४ सप्टेंबर या कालावधीत कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ाचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.  १५ ते २१ सप्टेंबर या कालावधीत कोकण विभाग, विदर्भाचा काही भाग येथे पाऊस पडू शकतो.  २२ ते २८ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत सरासरीइतक्या पावसाचा अंदाज आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Low pressure zone in bay of bengal rain all over the state heavy rain in konkan ysh