पुणे : नोकरदार महिलांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या महिलांमध्ये भविष्यात फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोकाही वाढत आहे. याचबरोबर स्वयंपाकघरातील धुरामुळेही महिलांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढू लागले आहे, असे निरीक्षण आरोग्यतज्ज्ञांनी नोंदविले आहे. महिलांनी फुफ्फुसांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासह धूम्रपानाचे व्यसन टाळावे, असा सल्लाही जागतिक फुफ्फुस कर्करोग दिनानिमित्त त्यांनी दिला आहे.

महिलांमधील धूम्रपानामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या धोक्यात झालेल्या वाढीबद्दल अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील डॉ. आदित्य देशमुख म्हणाले, की कामाच्या ठिकाणी तणावाचा सामना करावा लागतो, अशा महिलांना धूम्रपान हा तात्पुरता उपाय वाटू शकतो; परंतु प्रत्यक्षात ते दीर्घकालीन आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरते. सुमारे २० टक्के नोकरदार महिला ताणतणावामुळे धूम्रपान करण्यास प्रवृत्त होतात. भविष्यात त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो.

धूम्रपानामुळे अशा महिलांची फुफ्फुसे कमकुवत होतात. खोकल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांमध्ये २५-३५ वयोगटातील नोकरदार महिलांचे प्रमाण अधिक आहे. धूम्रपानाचे व्यसन टाळणे हे फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. यामुळे शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांना सुरळीतपणे ऑक्सिजनचा पुरवठा होतो, ऊर्जेची पातळी वाढते आणि फुफ्फुसांचे कार्य सुधारते.

स्वयंपाकघरातील प्रदूषणामुळे महिलांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल रुबी हॉल क्लिनिकमधील श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. महावीर मोदी म्हणाले, की आयुष्यात एकही सिगारेट ओढली नाही, अशा महिलांनाही फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची उदाहरणे दिसून येत आहेत. दक्षिण आशियामध्ये हे प्रमाण जास्त आहे. याला प्रामुख्याने स्वयंपाकघरातील धूर कारणीभूत ठरतो.

ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांना फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका आहे. त्याच वेळी शहरी भागात स्वयंपाकघरात पुरेशी वायुविजन व्यवस्था नसल्यासही महिलांना हा धोका निर्माण होतो. कारण स्वयंपाक करताना होणाऱ्या प्रदूषणातील विषारी घटक श्वासावाटे शरीरात जाऊन थेट फुफ्फुसावर दीर्घकाळ परिणाम करतात. सतत खोकला, श्वसनास त्रास आणि थकवा अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे महिलांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

लक्षणे कोणती?

  • सतत खोकला
  • श्वसनास त्रास
  • छातीत दुखणे
  • छातीत घरघर
  • खोकल्यातून रक्त येणे
  • वजनात मोठी घट
  • आवाजात बदल
  • भूक कमी होणे

काळजी काय घ्यावी?

  • धूम्रपान टाळा.
  • घरातील प्रदूषण कमी करा.
  • स्वयंपाकघरातील हवा खेळती ठेवा.
  • स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा वापर करा.