प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराजांनी लिंगनिदान दाव्यासंबंधी अशास्त्रीय व बेकायदेशीर वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोठी घोषणा केली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १६ जून २०२३ रोजी संगमनेर प्रथमवर्ग न्यायदंडाअधिकारी यांच्या कोर्टात सुरू असलेला खटला चालू ठेवण्याचा आदेश दिला. तसेच इंदुरीकर महाराजांविरोधातील खटला रद्द करण्याचा जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्द ठरविला. आता महा. अंनिसने इंदुरीकर महाराजांवरील खटला सुरू ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार असल्याची घोषणा केली. महा. अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी मंगळवारी (२० जून) पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उच्च न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना पुढील अपील करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे या काळात ते औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश किशोर संत यांच्या निकालाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्याअगोदरच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (महा. अंनिस) वतीने खबरदारी म्हणून सर्वोच्च न्यायालयात सावधानपत्र (कॅव्हेट) दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती अविनाश पाटील यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड बाबा अरगडे, अ‍ॅड. रंजना गवांदे पगार, विशाल विमल उपस्थित होते.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पत्रकार परिषद

“इंदुरीकरांना दोन वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा द्यावी”

अविनाश पाटील म्हणाले, “इंदुरीकर महाराज यांची सततची महिलांसंबंधी अपमानजनक वक्तव्य आणि गर्भलिंग निदानासंबंधीचा दावा हा स्त्रियांना दुय्यमत्व देणारा, पुरुषीव्यवस्थेला खतपाणी घालणारा आणि समर्थन देणारा आहे. त्यामुळे इंदुरीकरांविरोधातील खटला सुरू ठेवण्याचा न्यायालयाचा आदेश हा महाराष्ट्रातील स्त्रीभ्रूणहत्येला पोषक वर्तन व्यवहार करणाऱ्या सर्वांना चपराक देणारा आहे.”

व्हिडीओ पाहा :

“इंदुरीकर महाराजांकडून वारंवार स्त्रियांचा अपमान करणारी वक्तव्ये”

“उच्च न्यायालयाचा हा आदेश त्या अर्थाने स्त्रियांच्या जन्माच्या अधिकाराला विश्वास आणि स्वातंत्र्य देणारा आहे. इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आणि ते सतत स्त्रियासंबंधी अपमानित वक्तव्य करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्यानुसार कारवाई व्हावी. तसेच त्यांना दोन वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा देण्यात यावी,” अशी मागणी अविनाश पाटील यांनी केली.

इंदुरीकर महाराजांचं आक्षेपार्ह वक्तव्य कोणतं?

या प्रकरणाची माहिती देताना अंनिसने म्हटलं, “सम आणि विषम तारखेला स्त्रीशी संग केला; तर अनुक्रमे मुलगा व मुलगी होते, असे अशास्त्रीय व बेकायदेशीर वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी संगमनेर, शेलद (ता. अकोले), उरण (जि. रायगड), बीड याठिकाणी जाहीरपणे केले होते. त्यासंबंधीचे व्हिडिओ युट्युबवर अपलोड केले गेले होते. या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे झालेल्या महिलांच्या मानहानीबाबत आणि गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या उल्लंघनाबाबत महा. अंनिसने अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सकांकडे १७ फेब्रुवारी २०२० रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता.”

“आधी इंदुरीकर महाराजांकडून जाहीर माफीनामा”

“दरम्यानच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील आणि जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यवाहीतील पीसीपीएनडीटी कायदा अंमलबजावणीची जबाबदारी असणाऱ्या समितीच्यावतीने सदर प्रकरणात इंदुरीकर महाराजांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत, अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. पोलिसांच्या सायबर शाखेकडून आलेल्या नकारात्मक अहवालाच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी आक्षेपार्ह वक्तव्यांच्या संबंधातील पुरावे जिल्हा शल्यचिकित्सांकडे सादर केले. त्याच्या आधारावर जिल्हा शल्यचिकित्सकांकडून इंदुरीकर महाराजांना नोटीस बजावण्यात आली. त्याला वकिलांमार्फत उत्तर देताना सुरुवातीला जाहीरपणे असे सांगण्यात आले की, ‘मी असे काही वक्तव्य केलेच नाही’. नंतर १८ फेबुवारी २०२० रोजी इंदुरीकर महाराजांनी जाहीर माफीनामा प्रसिद्धीला दिला,” अशी माहिती अंनिसने दिली.

“या प्रकरणी अंनिसवर दबाव आणण्याचे व धमकवण्याचे प्रयत्न”

अंनिसने पुढे म्हटलं, “या पार्श्वभूमीवर महा.अंनिसच्यावतीने पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, याविषयी आग्रही भूमिका घेण्यात आली. त्यावेळी समाजातील काही हितसंबंधी आणि जातीयवादी लोकांकडून, संस्था-संघटनांकडून महा. अंनिसवर दबाव आणण्याचे व धमकवण्याचे प्रयत्न केले गेले. मात्र अशा कुठल्याही दबावाला व धमकीला न जुमानता महा. अंनिसच्यावतीने रंजना गवांदे, कॉम्रेड बाबा अरगडे, अविनाश पाटील यांनी इंदुरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला. जिल्हा व राज्य प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यासाठी कोणताही पुढाकार घेतला जात नसल्याने महा. अंनिसच्यावतीने रंजना गवांदे पगार यांनी अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक व जबाबदार यंत्रनेला नोटीस बजावली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.”

“जिल्हा कोर्टाने संगमनेर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा निर्णय रद्द ठरवला”

“२० जून २०२० रोजी संगमनेर येथील प्रथम वर्ग न्यायदंडअधिकाऱ्यांच्या कोर्टात (जे एम एफ सी कोर्टात) आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या वतीने खटला दाखल करण्यात आला. न्यायालयाने इंदुरीकर महाराजांविरुद्ध खटला चालवण्याची आदेशिका (इश्यू प्रोसेस) काढली. मात्र त्याविरुद्ध इंदुरीकरांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रद्द करावी, अशी याचिका दाखल केली. जिल्हा कोर्टाने संगमनेर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा निर्णय रद्द ठरवला. त्याविरोधात महा.अंनिसने ॲड. जितेंद्र पाटील व ॲड. नेहा कांबळे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी रीट याचिका दाखल केली. तसेच चार ते पाच महिन्यांनी याच प्रकरणात शासनानेही फौजदारी रीट याचिका दाखल केली,” अशी माहिती अंनिसने दिली.

हेही वाचा : इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

“…म्हणून महा. अंनिसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली”

“या दोन्ही याचिकांवर १६ जून २०२३ रोजी न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायमूर्ती संत यांनी संगमनेर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा खटला सुरू ठेवण्याची आदेशिका काढण्याचा निर्णय कायम ठेवला. तसेच अहमदनगर जिल्हा न्यायालयाचा निर्णय रद्द ठरविला. तसेच, इंदुरीकर महाराजांना पुढील अपील करण्यासाठी चार आठवड्यांची मुभा दिली आहे. इंदुरीकर महाराज हे उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या खटल्यासंबंधी महा. अंनिसला न डावलता त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सावधानपत्र दाखल करण्यात येत आहे,” असंही अंनिसने नमूद केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra annis big demand in nivrutti maharaj indurikar pcpndt case pbs